आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटी हॉस्पिटलला वाली कोण? माजी खासदार उत्तमसिंग पवार यांचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांचे आर्शयस्थान असलेल्या घाटी रुग्णालयाचा नावलौकिक उताराला लागला आहे. अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या रुग्णालयाला वाली कोण, असा सवाल माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित, राज्यमंत्री सुरेश शेट्टी यांना केला आहे. घाटीचा कायापालट करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

घाटी रुग्णालयाच्या दुरवस्थेविषयी ‘दिव्य मराठी’ने 17 भागांची मालिका प्रसिद्ध केली. इंदूरला 1994 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी एस. आर. मोहंती यांनी धडाकेबाज मोहीम राबवून तेथील एम.वाय. (महाराजा यशवंतराव) रुग्णालयाचा कायापालट केला होता. जे इंदूरमध्ये झाले ते औरंगाबादेत का नाही, असा प्रश्नही उपस्थित केला. त्याला सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. औरंगाबादला एका मोहंतीची गरज असल्याचेही ठामपणे म्हटले. या सार्‍याची दखल घेऊन पवार यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. गावित, राज्यमंत्री शेट्टी यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्यापुढे घाटीच्या दुरवस्थेचे चित्रच उभे केले.

औषधींचा तुटवडा, यंत्रणाही बंद : पवार यांनी मंत्रिमहोदयांना सांगितले की, घाटीमध्ये 400 वाढीव कर्मचार्‍यांची गरज असताना 175 जणांची कमतरता आहे. अत्यावश्यक औषधींचाही कायम तुटवडा असतो. जीवनदायी योजनेअंतर्गत रुग्णांच्या नावाने रक्कम घेतली जाते, पण त्यांना औषधीच दिली जात नाही. नव्याने सुरू करण्यात आलेल्या मेडिसिन विभागातील 12 पैकी आठ विभाग अजूनही कुलूपबंदच आहेत. कोट्यवधींची उपचार यंत्रे धूळ खात आहेत. एमआरआयसाठी एक महिना वेटिंग आहे. सीटी स्कॅनचेही एकमेव यंत्र असून तेही कायम बंद पडलेले असते.

रुग्णांचे नातेवाईक राहतात रस्त्यांवर : घाटी परिसरातील तिन्ही धर्मशाळा सुविधा नसल्याने बंद आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना रस्त्यावरच राहावे लागते. घाटी परिसरातील औषधी दुकानदार मनमानी पद्धतीने त्यांना वाटतील तीच औषधी खरेदी करण्यास भाग पाडतात. औषधींसाठी आठ कोटींची गरज असताना तुटपुंजा निधी दिला जातो. स्ट्रेचर्सची कमतरता आहे. तृतीय, चतुर्थर्शेणीतील अनेक कर्मचारी मद्यपान करून कामावर येतात. मोठी दुर्घटना घडल्यास अपघात विभागात एकावेळी दोन रुग्णांना जागा दिली जाते. डॉक्टर, परिचारिकाही पुरेशा नाहीत. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, कर्मचारी, फायनान्स हेड नाहीत.

महापालिकेचे मोठे रुग्णालय नाही : मुंबई, पुण्यासारखे औरंगाबाद महापालिकेचे स्वत:चे रुग्णालय नाही. येथील सिव्हिल हॉस्पिटलही कार्यक्षम नाही. कामगार, कर्मचार्‍यांसाठीचे ईएसआयसी हॉस्पिटल विश्वासपात्र नसल्याने रुग्णांचा ओघ घाटीकडे असतो. त्यामुळे प्रचंड ताण वाढत आहे. म्हणून पुण्यातील ससून, मुंबईच्या केईएमच्या धर्तीवर घाटी रुग्णालय सुसज्ज, अत्याधुनिक करावे, असेही पवार यांनी आवर्जून सांगितले.

डॉक्टर, उद्योजकांनाही आवाहन : पवार यांनी घाटीतून बाहेर पडलेले तज्ज्ञ डॉक्टर, उद्योजक, शैक्षणिक संस्था, प्रख्यात खासगी रुग्णालये, व्यापारी वर्ग यांनाही विनंतीपत्र पाठवले आहे. त्यात घाटीच्या कायापालटासाठी सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांनाही भेटणार
पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आपण लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार आहोत. 1970 ते 1980 या काळात सामान्य रुग्ण, गरिबांना घाटीबद्दल जो जिव्हाळा, विश्वास वाटत होता. तोच पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी पावले उचलावीत. तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, असे साकडे त्यांना घालणार आहोत, असेही पवार यांनी सांगितले. माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी सुक्रे यांनी काही प्रमाणात कर्मचार्‍यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची बदली करून त्यांच्या जागी डॉ. पी. एल. गट्टाणी यांची नियुक्ती केल्याबद्दल पवार यांनी मंत्रिमहोदयांकडे नाराजीही व्यक्त केली.