आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत तोंड पाहून उपचार; डीनच्या मुलीची खास सोय मात्र एचआयव्ही रुग्ण बेदखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मागच्या 21 दिवसांपासून एचआयव्ही बाधित बेवारस रुग्णाचे घाटीमध्ये अतोनात हाल होत असून, जणू वाळीत टाकल्यासारखी त्याची अवस्था आहे. बहुतेक डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचार्‍यांचा त्याच्यावरील अघोषित बहिष्कार स्पष्टपणे दिसत आहे. फार कमी हात त्याच्यावर उपचारासाठी पुढे येत असल्यानेच केवळ औपचारिकता म्हणून त्याला दाखल केले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, त्याचवेळी काही विशेष व्यक्तींना अगदी ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ मिळत असल्याचेही पुन्हा एकदा उघड झाले आहे.

23 जून रोजी पोलिसांनी एका पन्नास वर्षीय बेवारस व्यक्तीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तेव्हापासून आजतागायत ही व्यक्ती औषधवैद्यकशास्त्र (मेडिसिन) विभागात आहे. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरचे चित्र विदारक होते. मेडिसिन विभागातील आठ व नऊ वॉर्डामध्ये स्वच्छतागृहाच्या दारासमोरच्या भागात अगदी कोपर्‍यात त्याला जागा देण्यात आली आहे.
शरीराच्या काड्या झालेला देह झाकण्यासाठी केवळ एक पातळ पांढरी चादर अंगावर होती. झोपायला पलंग, डोक्यावर पंखा सुरू होता; पण थंडीने, अशक्तपणामुळे थरथरणाºया शरीराकडे कुणाचेही लक्ष नव्हते. आजूबाजूला अगणित माशा आणि दुर्गंधी जणू त्या बेवारस रुग्णाला घाटीकडून ‘सप्रेम भेट’ मिळाल्या होत्या. खराब झालेल्या चादरींचा खच बाजूला पडलेला होता. हा रुग्ण कुणालाही दिसू नये किंवा त्याचे काहीही झाले तरी कळू नये, यासाठीच जणू पूर्णपणे ‘कर्टन’ लावण्यात आला होता. आवाज दिल्यानंतर कसेबसे झाकलेले शरीर काढण्याइतपत त्याच्यात त्राण होते; परंतु नाव-पत्ता सांगण्याचे भान नव्हते. फक्त हाडांचा सापळा शिल्लक राहिलेल्या त्याच्या शरीराचे मनगट म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या मनगटासारखे झाले होते. सर्वांत गंभीर बाब म्हणजे त्याला ना सलाइन लावलेले होते ना इतर कुठले औषध.

‘त्यांच्या’साठी धावले अख्खे 3 विभाग
ज्या घाटीमध्ये बेवारस एचआयव्ही रुग्णाकडे पराकोटीचे दुर्लक्ष होते, त्याच घाटीमध्ये काहींना मात्र हमखास ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ मिळते. अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांच्या कन्येला शनिवारी (13 जुलै) याच मेडिसिन विभागातील ‘आयसीसीयू’मध्ये दीड-दोन तासांसाठी दाखल करण्यात आले होते. केवळ त्यांच्यासाठी ‘मेडिसिन’, ‘सर्जरी’ व ‘गायनॅक’ अशा तीन विभागांच्या डॉक्टरांनी धावाधाव केली होती. अर्थातच, विभागप्रमुखांनीही तातडीने हजेरी लावली होती आणि काय पाहिजे-नको त्याची गंभीरपणे खबरबात घेणे सुरू होते. मात्र, 21 दिवसांपासून दाखल असलेल्या बेवारस एचआयव्ही रुग्णाकडे कोणीही बघण्यास तयार नाही, ही माणुसकीची शोकांतिका असल्याचे प्रत्यक्षदर्शी म्हणतात.

कर्मचार्‍यांनी घातली आंघोळ
बहुतेक डॉक्टर-परिचारिकांनी दुर्लक्ष केले असले तरी काही चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनी त्या बेवारस रुग्णाला आंघोळ घातली, स्वच्छ केले. खाण्या-पिण्याची काळजी घेतली. मात्र उपचार तसेच शुर्शूषा करण्यासाठी फार कमी डॉक्टर-परिचारिकांनी पुढाकार घेतला. गेल्या 21 दिवसांत फारसे कोणी उपचार करण्यासाठी आलेच नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले.

उपचारामुळे प्रकृतीत सुधारणा
23 जून रोजी या बेवारस एचआयव्ही रुग्णाला पोलिसांनी घाटीत दाखल केले, तेव्हा हा रुग्ण बेशुद्ध अवस्थेत होता. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती आता सुधारत आहे. हा रुग्ण आता खातो आहे, उठून बसतो आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष झालेले नाही.
-डॉ. अविनाश मगरे, वैद्यकीय उपअधीक्षक, घाटी.