आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Ghati Hospital Issue DB Star Sting Operation

डॉक्टरची दुकानदारी, ट्रेनीची दलाली; 'घाटी'च्या वरिष्ठ डॉक्टरची खासगी प्रॅक्टिस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''दवाखाना एकाच्या नावावर, प्रॅक्टिस दुसर्‍याची, देखरेख तिसर्‍याचीच आणि पेशंट आणून उपचार करतो चौथाच. असा धक्कादायक प्रकार डीबी स्टारने आठवडाभर केलेल्या तपासातून उघड झाला. घाटीच्या डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसचे बिंग ‘दिव्य मराठी’ने याआधी फोडले आहे. आता निवासी डॉक्टर घाटीच्या गरीब रुग्णांना फसवून वरिष्ठांच्या खासगी दुकानदारीत उपचार करत कशा प्रकारे त्यांचे खिसे कापतात याचा पर्दाफाश करत आहोत.''

घाटीतील दंत महाविद्यालयात सर्जरी विभागात कार्यरत सिनियर सर्जन डॉक्टर अर्चना वाघमारे एनपीए घेऊन खासगी प्रॅक्टिस करतात. कामगार चौकात नोबेल क्लिनिक या नावाने त्यांचा दवाखाना आहे. कायद्यातून पळवाट शोधत नातेवाईक डॉ. रूपाली दामा यांच्या नावावर दवाखाना चालवला जातो. विशेष म्हणजे वाघमारे यांच्या अनुपस्थितीत डॉक्टर मेहेनाज दवाखान्याचे काम पाहतात. हे कमी म्हणून की काय, ट्रेनी डॉक्टर आशिष दिवेकर घाटीतील पेशंट पळवून या दवाखान्यात उपचार करतात. घाटीत उपचार होत असतानाही गरीब रुग्णांचा खिसा कापण्याच्या कामात हे शिकाऊ डॉक्टर आतापासूनच प्रशिक्षित झाल्याचे डीबी स्टारच्या तपासात उघड झाले आहे.

असा झाला उलगडा
दिनेश भालेराव या तरुणाचा सांस्कृतिक मंडळासमोर 3 जूनला रात्री 9.30 वाजता अपघात झाला. त्याच्या नाक, तोंड आणि समोरच्या दोन दातांना इजा झाली. तशा अवस्थेत त्याने घाटीत गाठले. अपघात विभागात प्रथमोपचार झाल्यानंतर त्याला सीएमओंनी त्यांना दंत महाविद्यालयात जाण्याचा सल्ला दिला. दंत महाविद्यालयात उपचार करण्यासाठी कुणीच नव्हते. भालेराव यांनी सीएमओंना माहिती दिल्यानंतर त्यांनी ट्रेनी डॉक्टर आशिष दिवेकर यांना बोलावले. आशिष यांनी खूप गंभीर दुखापत असल्याचे सांगून बाहेर उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आपला मोबाइल नंबर देत पेशंटला सकाळी फोन करायला सांगितले. भालेराव यांनी फोन केल्यानंतर डॉक्टर आशिष यांनी 7 हजारांपर्यंतचा खर्च येईल, असे सांगितले. ही रक्कम भालेराव यांच्याकडे नसल्याने त्यांनी ओळखीच्या डॉक्टरांकडे उपचार घेणे सुरू केले.

भीती आणि बार्गेनिंग.
खर्च परवडत नसल्याने आपण उपचार करू शकत नाही, असे सांगितल्याने आशिष यांनी खर्चाची चिंता करू नका, आपण डिस्काऊंट देऊ, असे सांगत 5 हजारांत ‘मांडवली’ केली. भालेराव यांनी दाद दिली नाही म्हणून आशिष यांनी पिच्छा पुरवला. वारंवार फोन करून लवकर उपचार न केल्यास इन्फेक्शन वाढेल आणि मोठय़ा आजाराला सामोरे जावे लागेल, असा (फुकटचा) सल्ला देत भीती दाखवली. संपूर्ण प्रकाराला कंटाळून भालेराव यांनी डीबी स्टारशी संपर्क केला. त्यानंतर डीबी स्टारने रुग्णाचा भाऊ बनून सिं्टग ऑपरेशनला सुरुवात केली. त्याचा संपादित भाग..

वेळ रात्री: फोनवरील संभाषण

पहिला दिवस-
> डॉक्टर आशिष : पेशंट आणणार की नाही ते सांगा. मलाही वेळ नसतो. तीन दिवस उलटून गेलेत. पेशंटची काळजी आहे की नाही तुम्हाला?
> प्रतिनिधी- साहेब इतके पैसे अँटजस्ट होत नाहीत..
> डॉक्टर- पैशाची चिंता करू नका. पैसे एकदम थोडेच द्यायचे आहे. हळूहळू ट्रीटमेंट होईल तसे पैसे द्या.
> प्रतिनिधी- बरं, पेशंटला कोठे आणू ते सांगा.
> डॉक्टर- उद्या 4 वाजता पेशंटला सिडको बसस्थानक चौकात घेऊन या आणि मला फोन करा. त्यानंतर सांगतो कोठे आणायचे.

दुसरा दिवस-
> डॉक्टर आशिष- काय हो पेशंट आणला नाही. मी वाट बघत होतो ना. असं केलं तर कसं चालणार ? इन्फेक्शन वाढेल आणि पुन्हा प्रॉब्लेम होईल.
> प्रतिनिधी- नाही साहेब, पाच हजार अँडजस्ट करायला थोडा वेळ लागेल. मला थोडा अजून डिस्काउंट मिळाला तर बरं होईल.
> डॉक्टर- अहो, सर्वात कमी पैसे सांगितले मी. दुसरीकडे विचारपूस करा, यापेक्षा जास्त लागतील. मटेरियलच चार ते साडेचार हजारांपर्यंत जाईल. मला उरणार तरी किती तुम्हीच सांगा.
> प्रतिनिधी- साहेब, घाटीत इलाज करा ना, मी तुम्हाला 3 हजार देईन.
> डॉक्टर- नाही हो, घाटीत ऑपरेट करण्यासाठी लागणारे इन्स्ट्रमेंन्स नाहीत. तुम्ही इकडे या तर खरं.

तिसरा दिवस-
> डॉक्टर- अहो, तुम्ही पुन्हा येतो म्हणालात, आला नाहीत. असे करू नका, मला वेळ नसतो.
> प्रतिनिधी- अहो, पैशांची अडचण होती. आता आलेत थोडे पैसे. सांगा कुठे घेऊन येऊ भावाला?
> डॉक्टर- तुम्ही 4 वाजता रुग्णाला सिडको बसस्टँड चौकात आणा आणि फोन करा.
> प्रतिनिधी- अहो साहेब, आमच्याकडे गाडी नाही. नेमकं कुठे आणू ते सांगा.
> डॉक्टर- कामगार चौक, तेथेच आपले क्लिनिक आहे.
> प्रतिनिधी- अहो, नाव तर सांगा ना दवाखान्याचे.
> डॉक्टर- तुम्ही कामगार चौकात या तर, मग सांगतो.

चौथा दिवस-
> डॉक्टर- अहो, तुम्हाला यायचं नसेल तर तसं सांगा. उगाच माझा वेळ वाया घालवू नका.
> प्रतिनिधी- सर, आज नक्की येतो. नेमकं कुठे येऊ सांगा प्लीज.
> डॉक्टर- कामगार चौकात आमचे नोबेल क्लिनिक आहे, तेथे या.
> प्रतिनिधी- ओके सर, येतो चार वाजता.

पाचवा दिवस
पैशासाठी वाट्टेल ते : वेळ 4 वाजेची. डीबी स्टार चमू नोबेल दवाखान्यात पोहोचला. डॉक्टर आशिष यांनी पेशंटबद्दल विचारले. आधी बोलू, नंतर पेशंट आणतो, असे चमूने सांगितले. एका प्रतिनिधीने डॉक्टरांना आपला एक दात दाखवला. डॉक्टरांनी दात डेड झाला आहे, त्याला रिप्लेस करा, नाहीतर आठ दिवसांत इन्फेक्शन होईल, असा सल्ला दिला. त्यासाठी साडेसात हजारांचा खर्च सांगितला. खरं तर प्रतिनिधीचा तो दात गेल्या 0 वर्षांपासून तसाच आहे. मात्र, कसेही करून पैसा मिळवण्यासाठी डॉक्टर आशिष यांनी इन्फेक्शनची भीती दाखवत थेट दात काढण्याचा सल्ला दिला. घाटीतील इतरही पेशंटना ते अशाच प्रकारे उपचारासाठी आणत असल्याचे त्यांच्या इतर लोकांशी फोनवरील संभाषणावरून स्पष्ट झाले.

सहावा दिवस-
डीबी स्टार चमू दुपारीच नोबेल दवाखान्यात पोहोचला. त्या वेळी डॉ. मेहेनाज तेथे होत्या. डॉक्टर आशिषने पाठवल्याचे सांगताच त्यांनी प्रकरण माहीत असल्याचे सांगितले.
> प्रतिनिधी- हा दवाखाना कुणाचा?
> डॉ. मेहेनाज- डेंटल कॉलेजच्या डॉक्टर अर्चना वाघमारे यांनी मला चालवण्यासाठी दिला आहे.
> प्रतिनिधी- डॉ. आशिष येथे कसे काय येतात ?
> डॉक्टर- ते आमचे व्हिजिटर आहेत. गरज पडते तेव्हा ते पेशंट कव्हर

डॉ. वाघमारे यांच्याशी झालेला संवाद
> प्रतिनिधी- मॅडम, मी भालेराव बोलतो. भावाचा अँक्सिडेंट झाला होता. दोन दात तुटले आहेत. तुम्हाला दाखवायचं आहे.
> डॉ. वाघमारे- मी सध्या बाहेर आहे. तुम्ही नंतर या.
> प्रतिनिधी- तसं नाही मॅडम, पेशंट घाटीत नाही तर तुमच्या नोबेल रुग्णालयात दाखवायचा आहे. डॉ आशिष खूप पैसे सांगत आहेत.
> डॉक्टर- तसे मी घाटीतील पेशंट घेत नाही; पण तुम्ही पर्सनली येत आहात म्हणून ठीक आहे. तसा आशिष जुनियरच आहे. तुम्ही संध्याकाळी 7 वाजता नोबेलवर या, आपण पेशंट बघून घेऊ.
> प्रतिनिधी- नोबेल क्लिनिक कुणाचे?
> डॉक्टर- माझेच क्लिनिक आहे.
> प्रतिनिधी-आपण एनपीए घेता का?
> डॉक्टर - हो, मी एनपीए घेते. नियमाने प्रॅक्टिस करता येत नाही; चूकच झाली.
> प्रतिनिधी- डॉक्टर आशिष यांना ओळखता का?
> डॉक्टर -डॉक्टर आशिष आणि माझ्या क्लिनिकचा संबंध नाही. केवळ आम्ही एका डिपार्टमेंटमध्ये काम करतो. तो खूप ज्युनियर आहे. अशी मुले दोन-दोन महिन्यांनी बदलतात.
> प्रतिनिधी- डॉ. आशिष यांनी घाटीतील रुग्ण आपल्या क्लिनिकमध्ये आणून उपचार करण्याचा सपाटा लावला आहे.
> डॉक्टर- घाटीच्या रुग्णांचा माझ्याशी काहीच संबंध नाही. त्याने आणि येथील मुलीने परस्पर हे धंदे केलेले दिसत आहेत. यात मला काहीच माहीत नाही.
> प्रतिनिधी- आपली क्लिनिकला येण्याची वेळ कोणती ?
> डॉक्टर - मी रात्री 7 ते 9 या वेळेत क्लिनिकवर असते. घरी वेळ जात नाही म्हणून टाइमपास होतो.
> प्रतिनिधी- आपण कधीपासून क्लिनिक चालवत आहात ?
> डॉक्टर- मी तीन वर्षांपासून हे क्लिनिक चालवत आहे. केवळ दोन महिन्यांपासून माझी विद्यार्थिनी डॉ. मेहेनाज यांना दुपारी सहकार्याच्या भावनेतून दवाखाना दिला होता. त्यांनी माझा विश्वासघात केला. 20 वर्षांत मी एकदाही घाटीतील पेशंटचा बाहेर उपचार केला नाही.
> प्रतिनिधी- आपणच चूक केली, मग विद्यार्थ्यांना जबाबदार कसे धरता?
> डॉक्टर- हा माझा दवाखाना नाही तर माझी नणंद डॉक्टर रूपाली दामा यांचा आहे.
> प्रतिनिधी-दवाखाना डॉ. रूपाली दामांचा आहे, मग आपण प्रिक्रिप्शन कसे देता?
> डॉक्टर- नणंद मला अगोदरच लेटरवर सह्या करून देतात. लेटरपॅड त्यांच्याच नावाचे आहे.
प्रतिनिधी- पण तुमच्या क्लिनिकमध्ये घाटीतील पेशंट आणले जातात हे स्पष्ट आहे.
> डॉक्टर- मी उद्यापासून डॉक्टर मेहेनाज यांची हकालपट्टी करणार आहे. आशिषची चांगली खरडपट्टी काढेन.
> प्रतिनिधी- पाटीवर लिहिलेले डॉ. दामा हे कोण आहेत?
> डॉक्टर- मॅडमना खासगी प्रॅक्टिस करता येत नाहीत ना, म्हणून पाटीवर त्यांच्या नणंदेचे नाव टाकले आहे. मॅडमचे सासरचे नाव दामा आहे.
> प्रतिनिधी- डॉ. दामा कुठे असतात?
> डॉक्टर- डॉ. रूपाली दामा या एमजीएममध्ये असतात. त्यांना प्रायव्हेट प्रॅक्टिस अलाऊड आहे.
> प्रतिनिधी- त्या येथे येतात का?
> डॉक्टर- नाही, त्या येत नाहीत. सध्या सर्व काम मीच पाहते.
( एकंदरीत हा दवाखाना डॉ. वाघमारे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासासाठी चमूने वाघमारे यांना फोन केला.)