आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तातडीच्या सोनोग्राफीलाही फाटा; 'घाटी'त गंभीर रुग्णांकडे दुर्लक्ष कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- घाटीमध्ये सोनोग्राफीसाठी अत्यवस्थ गर्भवती महिलेला तासन्तास ताटकळत ठेवल्याचे पुन्हा एकदा समोर आले. विशेष म्हणजे याच गर्भवतीला रात्री साडेअकरा वाजता दोनदा सोनोग्राफी न करता परत पाठवले आणि अतिशय नाजूक अवस्थेत दोन जिने चढायला-उतरायला लावले. त्याचवेळी घाटीच्या एका डॉक्टरने तातडीने सोनोग्राफी करण्यासाठी पाठवले, तर दुसर्‍या डॉक्टरने दुसर्‍या दिवशी दुपारी दोनची वेळ दिली. दुसर्‍या दिवशीची वेळ देणारे डॉक्टर ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. अक्षय भालसिंग असून, त्यांच्याविरुद्ध नातेवाइकाने वैद्यकीय अधीक्षकांसह ‘दिव्य मराठी’ला लेखी तक्रार दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गंभीर रुग्णांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. योग्य वेळी निदान न झाल्यामुळे सात वर्षांच्या चिमुकलीचे अपेंडिक्स पोटातच फुटल्याचा प्रकार ताजा असताना, वेगवेगळ्या तातडीच्या तपासण्यांसाठी अगदी अत्यवस्थ रुग्णांकडेही दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. जिन्सी भागात राहणारे सिराज अहेमद यांनी पत्नी सारा जबीन (वय 21) यांना 22 ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास घाटीच्या अपघात विभागात दाखल केले. आठ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सारा जबीन यांच्यावर एका तासात सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागेल, अशी शक्यता खासगी डॉक्टरांनी व्यक्त केल्यानंतर, सिझेरियन शस्त्रक्रिया करायचीच असेल तर ती घाटीतच अधिक योग्य पद्धतीने होईल, या विश्वासाने त्यांनी पत्नीला घाटीत दाखल केले. अपघात विभागात दाखल केल्यावर लगेचच सिराज यांच्या पत्नीला प्रसूतिकक्षात हलवण्यात आले. मात्र, तिथे असलेल्या निवासी डॉॅ. चंदा छतलानी यांनी तातडीने सोनोग्राफी करून आणा, असे लिहून दिले. त्यामुळे सिराज हे पत्नीला घेऊन सगळ्यात खालच्या मजल्यावरील क्ष-किरण विभागात आले. लिफ्ट बंद असल्याने नाजूक अवस्थेतच महिलेला जिन्याने यावे लागले. क्ष-किरण विभागात किमान सहा ते सात रुग्ण होते; परंतु एकही डॉक्टर किंवा तंत्रज्ञ नव्हता. तासभर प्रतीक्षा केल्यानंतर क्ष-किरण विभागातील निवासी डॉक्टर व ‘मार्ड’चे शहर अध्यक्ष डॉ. अक्षय भालसिंग तिथे आले. त्यांनी रुग्णांच्या तपासण्या करण्याऐवजी उपस्थित सर्वांनाच तपासणीची तारीख दिली. सारा जबीन यांच्या केसपेपरवर ‘अर्जंट’ असे स्पष्ट लिहून दिल्यानंतरही त्यांना दुसर्‍या दिवशीची म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी दुपारी दोनची वेळ देण्यात आली.

‘डॉक्टरांनी तातडीची तपासणी सांगितली आहे, कृपया सोनोग्राफी करून द्या’ अशा शब्दांत विनंती केल्यानंतरही डॉ. अक्षय निघून गेले. परत दोन जिने चढून आल्यानंतर प्रसूतिकक्षातील डॉक्टरांनी ‘तपासणी आवश्यक आहे, निदान गर्भाशयात पाणी किती आहे, एवढेच सोनोग्राफी करून सांगितले तरी चालेल, रिपोर्टची घाई नाही, त्याशिवाय पुढचा निर्णय घेता येणार नाही’ असे सांगून पुन्हा गर्भवतीला खाली पाठवले. जिने उतरून खाली आल्यानंतर क्ष-किरण विभागात कोणीच नव्हते.

अत्यवस्थ पत्नीच्या काळजीपोटी सिराज यांनी आपले मित्र शकील खान यांच्याकडे मदत मागितली. शकील खान यांनी विनंत्या करून एका डॉक्टरला सोनोग्राफीसाठी कसेबसे तयार केले. पाऊण तास प्रतीक्षा केल्यानंतर दुसर्‍या एका डॉक्टरने सोनोग्राफी केली. दुसर्‍या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास म्हणजेच संबंधित महिलेला दिलेल्या सोनोग्राफीच्या वेळेआधीच तिची नैसर्गिक प्रसूती झाली. माझ्या पत्नीची सोनोग्राफी झाली; परंतु इतर रुग्णांना तपासणीविनाच परतावे लागले, असे सिराज अहेमद यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

वैद्यकीय अधीक्षकांकडे लेखी तक्रार
सिराज अहेमद यांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दिली असून, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. युसूफ मणियार व डॉ. अनिल जोशी यांनी तक्रार मिळाल्याचे सांगितले. या तक्रारीत डॉ. अक्षय यांनी आमच्या फाइलकडे बघितले नाही व सर्वांना हाकलून दिल्याचासुद्धा उल्लेख आहे. तसेच विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे यांना फोनवर डॉ. अक्षय यांचे नाव सांगताच, त्यांनी फोन कट केल्याचेही तक्रारकर्त्यांनी म्हटले आहे.

प्रसूतिकक्षात सोनोग्राफीची सोय नाहीच
अत्यवस्थ व गंभीर गर्भवती रुग्णांची सोनोग्राफी करण्याची सोय प्रसूतिकक्षात अजूनही नाहीच. त्यामुळे गर्भवतींना सोनोग्राफीसाठी खालच्या मजल्यावर यावे लागते. स्ट्रेचर असेल व लिफ्ट सुरू असेल तर ठिक, नाहीतर दोन मजले जिने चढावे-उतरावे लागतात. या विषयी स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. र्शीनिवास गडप्पा म्हणाले, प्रसूतिकक्षासाठी एका महिन्यापूर्वी सोनोग्राफी मशीन उपलब्ध झाले आहे. मशीनची नोंदणी पीएनडीटी कमिटीमध्ये केली आहे. मात्र, अद्याप प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्याचा वापर करता येत नाही. रोज किमान चार-पाच अत्यवस्थ रुग्णांना सोनोग्राफीसाठी खाली जावे लागते, असेही ते म्हणाले.

चौकशी नंतर दोषींवर कारवाई करू
या प्रकरणी चौकशी केली जाईल. त्यानंतर यात कोणी दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याआधी सांगता येणार नाही.
- डॉ. पी. एल. गट्टाणी, वैद्यकीय अधीक्षक, घाटी.