आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad Ghati Hospital, Patient Break Fast Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातील रुग्णांच्या नाष्ट्यात चुकचुकली पाल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- घाटी रुग्णालयात रुग्णांना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उसळीत पाल निघाल्याचे कळाले आणि नर्सिंगचे कर्मचारी हबकले. हीच उसळ रुग्णांच्या पोटात जाणार आणि नको नको ते घडणार.. या भीतीने कर्मचार्‍यांनी कधी नव्हे इतक्या तत्परतेने अधीक्षकांना फोन लावला. तिकडे अधीक्षक साहेबांचीही ‘पाचावर धारणा.’ उसळ वाटू नका. थांबवा. असे साहेबांनी फर्मान सोडले. दुसर्‍याच क्षणाला अधीक्षक साहेब ताडकन उठले आणि त्यांनी थेट घाटी गाठली. अखेर ते सत्य समोर आले आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला!

घाटीच्या स्वयंपाकघरातून (किचन) रुग्णांना नाष्टा तसेच जेवण पुरवले जाते. त्यासाठी स्वतंत्र विभाग व स्वतंत्र कर्मचारीवर्ग आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास घाटीत दाखल असलेल्या बाराशेपेक्षा जास्त रुग्णांना नाष्टा दिला जातो. बुधवारी नाष्ट्याचा मेनू होता पोळी आणि उसळ. दोन्ही पदार्थ तयार होते आणि रुग्णांना वाटप होणार होतेच.

मात्र परिचारिकांपैकी कुणाला तरी उसळीत पाल दिसली आणि ती परिचारिका हबकली. दोनदा-तिनदा नव्हे तर अनेकदा तिने उसळीत न्याहाळून पाहिले. अखेर तिची खात्री झाली आणि तातडीने अधीक्षक साहेब अर्थात डॉ. पी. एल. गट्टाणी यांना फोनवरून पालीची ‘वर्दी’ दिली.

अधीक्षक डॉ. गट्टाणी यांच्या उपस्थितीत पाहणी झाली आणि सर्वांची 100 टक्के खात्री झाली.. साहेबांचा वाढलेला बीपीही खाली आला आणि फार मोठय़ा धर्मसंकटातून आणि विशेष म्हणजे मीडिया संकटातून मुक्त झाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. कारण ‘ती’ पाल नव्हती तर अद्रक होते, असा ‘चौकशी समिती’ने अहवाल देऊन टाकला होता. मात्र तोपर्यंत अख्ख्या घाटीमध्ये रुग्ण व नातेवाइकांचा ‘थयथयाट’ सुरू होता.