आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घाटी नर्सिंग महाविद्यालयातील शिक्षकाकडून प्राचार्यांना मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वरिष्ठांकडे तक्रारी केल्यामुळे लातूरला बदली झाल्याचा आरोप करत नर्सिंग महाविद्यालयामध्ये येऊन शिक्षकाने प्रभारी प्राचार्यांना मारहाण केली. मंगळवारी (6 ऑगस्ट) सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घाटी परिसरात घडला. प्रभारी प्राचार्यांना मारहाण केल्यानंतर हा शिक्षक फरार झाला असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

कामात कसूर करत असल्याने घाटी प्रशासनाने नर्सिंग महाविद्यालयातील शिक्षक (चिकित्सालयीन पाठय़निर्देशक) किसन गायकवाड यांची शासनाकडे तक्रार केली. शासन आदेशाने गेल्या महिन्यात त्यांची लातूरला बदली झाली. यापूर्वीदेखील गायकवाड यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी कर्मचार्‍यांनी केल्या होत्या. दरम्यान, आज सकाळी गायकवाड यांनी प्रभारी प्राचार्य अर्जुन विठ्ठल सोनटक्के यांना गाठत वरिष्ठांकडे माझ्या लेखी तक्रारी का करता, असे म्हणत त्यांची गचांडी धरली व मारहाण करत महाविद्यालयात धुमाकूळ घातला. मारहाणीत खिडकीची काच फुटली आहे.

हा प्रकार पाहून महाविद्यालयातील कर्मचारी अवाक् झाले. त्यांनी दोघांमधील भांडण सोडवले. यानंतर गायकवाड पसार झाले, तर सोनटक्के यांनी घटनेची माहिती अधिष्ठाता के. एस. भोपळे यांना दिली. तसेच अधिष्ठातांच्या परवानगीने बेगमपुरा पोलिस ठाणे गाठून सोनटक्के यांनी गायकवाड यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून याचा पुढील तपास जमादार टी. एन. पवार करीत आहेत.