आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : 100 कोटी मिळाले; किमान 12 रस्ते होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. - Divya Marathi
एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद- शहरातील रस्त्यांसाठी १५० कोटी रुपये देणार, असे मुख्यमंत्र्यांनी दीड वर्षापूर्वी जाहीर केले होते. ही रक्कम कधी मिळणार याकडे तमाम औरंगाबादकरांचे लक्ष लागले होते. अखेर यातील १०० कोटी रुपये राज्य शासनाने बुधवारी मंजूर केले. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घाईत जालन्याहून औरंगाबाद गाठत पत्रकार परिषदेत याची घोषणा केली.
 
या पत्रकार परिषदेला महापौरांसह भाजपचेच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हजर होते. अन्य पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांना याची खबरही लागू दिली नाही. भाजपने परस्पर घोषणा केल्याचे समजताच शिवसेनेने थयथयाट केला, तर विरोधी पक्ष एमआयएमने थेट महापौर भगवान घडमोडे यांचा पुतळा पालिका मुख्यालयासमोर जाळण्याचा प्रयत्न केला. 
 
राज्य शासनाने बुधवारी मंजूर केलेले १०० कोटी रुपये नेमके कधी पालिकेच्या हाती पडतील, हे आत्ताच सांगता येत नाही. परंतु केवळ श्रेय घेण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध एमआयएम असे राजकारण सुरू झाले. येत्या काही दिवसांत ते आणखी तापू शकते. पालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढी मोठी रकम एकाच वेळी पालिकेला मिळाली आहे. 
 
राज्य शासनाने १०० कोटी रुपये मंजूर केल्याचा आदेश जारी होताच भाजपच्या वतीने लगेच पत्रकार परिषद घेऊन त्याची घोषणा करण्याचे ठरले. प्रदेशाध्यक्ष दानवे, महापौर भगवान घडमोडे, आमदार अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्यासह भाजपचे सर्व आमदार या वेळी उपस्थित होते. 
 
परंतु शिवसेना, काँग्रेस, एमआयएमंच्या स्थानिक नेत्यांना किंवा पालिका पदाधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे सेनेच्या उपमहापौर स्मिता घोगरे, सभागृह नेते गजानन मनगटे भडकले होते. त्यांनी लगेच पत्रकारांना पाचारण केली. शहरासाठी पैसे मिळताहेत ही चांगली गोष्ट, पण लवपण्यासारखे काय होते, आम्ही तेथे आलो असतो तर त्यांच्या हातातून माइक हिसकावून घेतले असते का, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदनच केले असते.
 
 १५० कोटींच्या रस्त्यांची यादी तयार करण्यातही गुपित पाळले जातेय, हा निधी आणून काही तरी वेगळेच गौडबंगाल त्यांना करायचे असावे, असा संशय आहे. यापुढील काळात त्यांना जाब विचारला जाईल, असे मनगटे म्हणाले, तर पैसे मिळाल्याबद्दल अभिनंदन करतानाच पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या पक्षाकडून असे का होते, यावर भलतीच शंका असल्याचे घोगरे म्हणाल्या. २४ कोटींच्या रस्त्याचे कामांचे काय झाले, याचीही विचारणा करू, असेही त्या म्हणाल्या. 
 
हा तर जनतेचा विश्वासघात : दीड वर्षापूर्वी शहराला १५० कोटी रुपये देणार, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर फक्त १०० कोटी मंजूर केले आणि त्याचे श्रेय घेतले जातेय. प्रत्यक्षात शहराच्या रस्त्यांसाठी दीडशे कोटी रुपयेही कमी होते. तरीही घोषणेनुसार तेवढी रक्कम तरी द्यायला हवी होती. तसे करणे म्हणजे हा विश्वासघात आहे. पत्रकार परिषद घेतल्याने श्रेय कोणाकडे जात नसते. शिवसेना काय करते हे जनतेला माहिती आहे. भाजपने तोंंडाला पाने पुसली हे जनता विसरणार नाही, असे अंबादास दानवे म्हणाले. 
 
मित्रपक्ष शिवसेनेचा थयथयाट, एमआयएमकडून महापौरांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न; पहिल्यांदाच रस्त्यांसाठी मिळाला एवढा मोठा एकरकमी निधी 
 
काही रस्त्यांची लांबी, रुंदी जास्त असल्याने 
- २४ कोटी ०५ कामे झाली होती. 
- १०० कोटी २० रस्ते व्हायला हवेत. 
- त्या निकषानुसार २०ते २२ रस्ते कामे होऊ शकतात. 
- मात्र, काही रस्त्यांची लांबी जास्त असणार असल्याने त्यासाठी जास्तीचा खर्च येईल. त्यामुळे १२ ते १५ रस्ते होऊ शकतील. तशीच तयार मनपा प्रशासनाने केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
हे होतील रस्ते
निराला बाजार-नागेश्वरवाडी ते मनपा मुख्यालय, मछली खडक ते रंगारगल्ली, पीर बाजार ते देवळाई चौक, चिश्तिया कॉलनी ते बळीराम पाटील चौक, आझाद चौक ते पुढे जळगाव रोड या रस्त्यांचा समावेश असणार आहे. विकास आराखड्यातील वर्दळीचे प्रमुख रस्ते आणि दोन विकास आराखड्यांतील रस्त्यांना जोडणारे रस्ते असा निकष यासाठी आहे. मे २०१५ मध्ये २४ कोटी रुपये पाच रस्त्यांसाठी मिळाले होते. त्यांचे काम महिनाभरात पूर्ण होऊ शकते, असा मनपाचा दावा आहे. 
 
घोषणा होत असतानाच... 
दानवे, घडमोडेंकडून रस्ता निधीची घोषणा होत असतानाच एमआयएमकडून महापौरांचा पुतळा जाळण्याचे नियोजन करण्यात येत होते. विरोधी पक्षनेते फेरोज खान, नगरसेवक विकास एडके, संगीता वाघुले यांच्या उपस्थितीत पालिका मुख्यालयासमोर पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून श्रेय घेण्यासाठी खालच्या पातळीचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.  
 
घडमोडेंच्या काळात कामे 
घडमोडे यांची महापौरपदाची कारकीर्द फक्त चार महिन्यांची शिल्लक राहिली आहे. त्यामुळे या काळात रस्त्यांची कामे कशी सुरू होतील, यावर दानवे म्हणाले, घडमोडे यांच्या काळात ही कामे सुरू होतील, यासाठी आमचा प्रयत्न आहे. लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. 
 
दानवे म्हणाले, पैसे येतील 
पहिल्या टप्प्यात २४ कोटी मिळाले, आता १०० कोटी देण्यात आले आहेत. ही रक्कम तशी कमीच आहे. परंतु ही कामे पूर्ण झाल्यानंतर आणखी निधी मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. महापौर घडमोडे आमदार सावे यांच्यासमवेत आपणही या रस्त्यांसाठी पाठपुरावा केल्याचे ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...