आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घाटी अत्यावस्थ : यंत्रे आजारी, रुग्णसेवा अपंग !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घाटीतील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत अतिमहत्त्वाच्या उपकरणांची संख्या निम्मीच आहे. त्यातही सुस्थितीतील निम्म्या उपकरणांना वर्षभर ‘नादुरुस्त’चे ग्रहण असते. केवळ एक-दोन उपकरणांवर 12 ते 14 जिल्ह्यांतील रुग्णांचा भार आहे. अनेक उपकरणे कायमस्वरूपी खराब आहेत. नवीनचा तर पत्ताच नाही. दुसरीकडे, अनेक अत्याधुनिक उपकरणांना वापराविनाच गंज चढत आहे. कमालीच्या बेजबाबदारपणामुळे अशा स्थितीची किंमत मात्र जीवनमरणाच्या दारातील गरीब रुग्णांना सातत्याने मोजावी लागत आहे.

उपकरणांची संख्या दुप्पट हवी
सद्य:स्थितीत केवळ दोन एक्स-रे मशीन, दोन सोनोग्राफी, एक सीटी स्कॅन, एक एमआरआय मशीन सुरू आहे. त्यामुळे रोजच एका-एका एक्स-रे मशीनवर 200-250 तपासण्या, सोनोग्राफीच्या 150-200 तपासण्या, सिटी स्कॅनच्या 50 ते 60 तपासण्या होतात. डायलिसिसच्या दोन मशीन कायमस्वरूपी खराब, तर दोन मशीन नादुरुस्त आहेत. केवळ दोन मशीन सुरू आहेत. मुतखडा फोडण्याचे एकमेव लिथोट्रिप्सी तीन वर्षांपासून कायमस्वरूपी खराब झाले आहे. नवे मशीन कधी येईल, हे प्रशासनही सांगू शकत नाही. काही ईसीजी मशीनही बंद आहेत. मोजक्याच उपकरणांवर मोठा ताण येत असल्याने कुठल्याही क्षणी कोणतेही उपकरण बंद पडू शकते, अशी स्थिती आहे. त्यासाठी सगळ्याच उपकरणांची संख्या दुपटीने वाढवणे, उपकरणांबरोबरच तंत्रज्ञ व इतर पदांची भरती करणे, जलद दुरुस्तीसाठी विशेष उपाययोजना व आर्थिक नियोजन करणे आवश्यक असल्याचे मतही तज्ज्ञांनी नोंदवले.

क्रॉसचेक नसल्याने 50 टक्के ताण
ओपीडीमध्ये अनेकदा निवासी डॅक्टरदेखील एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या तपासण्या सांगतात. या तपासण्यांबाबत पथकप्रमुख किंवा विभागप्रमुखांकडून क्रॉसचेक होत नाही. ‘क्लिनिकल नॉलेज’चा वापर करून तपासण्या सुचविल्यास उपकरणांवरील ताण 40 ते 50 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. दररोज निम्मा ताण कमी झाल्यास उपकरणांचे आयुष्य वाढेल आणि रुग्णांचे पैसेही वाचतील, असे काही डॉक्टर-तज्ज्ञांनी दै. ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

‘त्या’ उपकरणांची जबाबदारी कोणाची?
एनआयसीयू, ट्रॉमा केअर सेंटरची उपकरणे, हृदयरोग्यांसाठी उभारलेल्या; पण सध्या उपचार, शस्त्रक्रिया थांबलेल्या सीव्हीटीएसमधील उपकरणे धूळ खात पडून आहेत. कॅन्सर हॉस्पिटलची महागडी उपकरणेही दोन वर्षे पडून होती. वापराविना पडून असलेल्या कोट्यवधींच्या उपकरणांची वॉरंटीही संपते. अशा उपकरणांमध्ये काही समस्या निर्माण झाली, तर कंपनी प्रतिसाद देत नाही. तेव्हा ही जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण होतो.

दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल
2013-14 मध्ये घाटीला किती नवीन उपकरणे मिळणार, याचे चित्र 31 मार्चपर्यंत स्पष्ट होईल. तोपर्यंत याविषयी काही ठाम सांगता येणार नाही. डॉ. पी. एल. गट्टाणी, वैद्यकीय अधीक्षक