आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Gulmandi Two Mandi Breaking At Aurangabad

गुलमंडीवरील दोन धार्मिक स्थळे पाडण्यावरून औरंगाबादमध्ये तणाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: गुलमंडीवरील दोन धार्मिक स्थळे पाडण्यावरून शुक्रवारी या भागात दिवसभर तणावाचे वातावरण होते. महापालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या दालनात तणाव कमी करून पाडापाडीला हिरवा कंदील मिळवण्यासाठी बैठकांचे सत्र झडले. रात्री उशिरापर्यंत ठोस निर्णय झाला नाही. मात्र शनिवारी कुठल्याही परिस्थितीत या स्थळांचा रुंदीकरणात येणारा भाग पाडला जाईल, असे भापकरांनी स्पष्ट केले.
आज पथक एका स्थळाजवळ पोहचल्यानंतर जमाव आक्रमक झाला. त्यामुळे मोहीम दुसरीकडे वळवण्यात आली. त्यासोबतच वहीदकाका, आमदार किशनचंद तनवाणी, प्रदीप जैस्वाल यांच्यासह अनेकांसोबत भापकरांनी चर्चा केली. अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करून शनिवारी कारवाईची तयारी मनपा, पोलिस प्रशासनाने केली आहे. टिळक पथ, गुलमंडीवरील हटाव मोहिमेमुळे सारा परिसर मोकळा झाला आहे. पैठण गेटवरच्या पद्मविभूषण गोविंदभाई र्शॉफ यांच्या पुतळ्याची पहिले नगराध्यक्ष द्वारकादास पटेल यांच्या गुलमंडीवरील पुतळ्याशी पहिल्यांदाच नजरभेट होऊ शकली आहे. शुक्रवारी या मोहिमेत पथकाने पैठण गेटपर्यंतची अतिक्रमणे भुईसपाट केली. दिवसभरात 50 इमारती पाडण्यात आल्या.
प्रसिद्ध राजधानी क्लॉथ सेंटरचे पाच फुटांचे बांधकाम पाडण्यात आले. पथक राजधानीजवळ असताना पैठण गेटपर्यंतची अनेक दुकाने रिकामी झाली होती. काही जणांनी पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत दुकानांतील सामान काढून घेण्यास सुरुवात केली होती. रात्रंदिवस ढिगारे उचलून नेण्याचे काम सुरू असले तरी टिळक पथावर सर्वत्र ढिगारेच ढिगारे दिसत होते. जुन्या इमारतींमधील सागवानी लाकूड, लोखंडी साहित्य मिळवण्यासाठी अनेकांनी धाव घेतली होती. लाकूड जमा करणारे कोण हे समजून येत नव्हते. शहराच्या इतिहासातील सर्वात मोठी मोहीम ठरल्याने बघ्यांचीही मोठी गर्दी झाली. त्यांना हुसकावताना पोलिसांना प्रसंगी लाठय़ाही वापराव्या लागल्या. या मोहिमेमुळे केम्ब्रिज, दुल्हा-दुल्हनसह सर्वच मोठी दुकाने बंद होती. गेल्या तीन दिवसांपासून गुलमंडीवर खरेदी बंद आहे.
आज पैठण गेट ते नूतन कॉलनी
पैठण गेट ते नूतन कॉलनी रस्त्यावरील अतिक्रमणे तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी काढून टाकली; परंतु नंतर तेथे पुन्हा फुलांची दुकाने थाटण्यात आली. उद्या दुपारी पथक या रस्त्यावर कामगिरी करणार आहे.
अतिक्रमणधारकांना नोटिसा
गुलमंडीपाठोपाठ लक्ष्मण चावडी ते एमजीएम, पानदरिबा, रोशनगेट ते आझाद चौक, कटकट गेट ते पोलिस ऑफिसर्स मेस, क्रांती चौक ते रेल्वेस्थानक या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. नोटिसा मिळाल्या नसल्या तरी तेथील अतिक्रमणधारकांनी मालमत्तांचा ताबा सोडावा असे बजावण्यात आले.