आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात साकारत आहे एक कोटीची हँडलूम नगरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हातमागाच्या वस्त्रांना चालना मिळावी यासाठी 30 जानेवारी ते 19 फेबुवारीदरम्यान हे आयोजन करण्यात आले आहे. शहरात पहिल्यांदाच होणार्‍या या प्रदर्शनासाठी तापडिया-कासलीवाल मैदानाच्या 4 एकर जागेवर भव्य हातमाग नगरीच उभारली जात आहे. दररोज 8 ते 10 हजार ग्राहक या नगरीला भेट देतील, अशी संयोजकांना अपेक्षा असून त्यातून 8 -10 कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे देशभरातील हातमाग विणकरांनी तयार केलेल्या वस्त्रांना प्रोत्साहन मिळावे व मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी या हेतूने या खात्याच्या विपणन विभागातर्फे राष्ट्रीय हातमाग एक्स्पोचे आयोजन केले जाते. 15 लाख लोकसंख्या असणार्‍या शहरातच हे प्रदर्शन भरते, परंतु राज्य हातमाग महामंडळ (इंद्रायणीतर्फे) औरंगाबादराचे महत्त्व केंद्राला पटवून देण्यात आले. यामुळे शहरात हे प्रदर्शन भरणार आहे.

18 राज्यांचा सहभाग : प्रदर्शनात 18 राज्यांतील हातमाग महामंडळ व त्या-त्या राज्यातील हातमाग क्षेत्रातील संस्था सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्याला त्यांच्या मागणीनुसार 500 ते 2000 चौरस फुटांचे स्वतंत्र दालन देण्यात आले आहे. 18 राज्यांच्या 18 पॅव्हिलियनमध्ये तब्बल 70 स्टॉल्स असतील. वस्त्रोद्योग मंत्रालयाचे स्वतंत्र अडीच हजार चौरस फुटांचे थिम पॅव्हिलियन असेल. येथे हातमागावर वस्त्र तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल. प्रत्येक पॅव्हेलियनमध्ये त्या-त्या राज्यातील प्रसिद्ध साड्या, टस्सर सिल्क, विविध डिझाइन्सची वस्त्रे असतील.

पहिल्यांदाच पॅव्हिलियन मंडप : शहरात या प्रदर्शनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच पॅव्हिलियन प्रकारचा मंडप उभारला जात आहे. कोलकाता आणि दिल्लीची कंपनीच या प्रकारचे मंडप उभारते. या प्रकारात प्लायबोर्ड कापून स्टॉल्स तयार केले जातात. त्यात डिस्प्लेसाठी काचेची कपाटे असतील. खर्‍याखुर्‍या दुकानांसारखेच याचे स्वरूप असेल. मंडप उभारणीचे साहित्य घेऊन 27 ट्रक आणि 100 कारागीर दिल्लीहून आले आहेत. ग्राहकांना फिरण्यासाठी मोकळी जागा व स्ट्रीट लाइटही लावले जातील. खवय्यांसाठी फूड प्लाझाही असेल.

कोट्यवधींची उलाढाल : हँडलूम नगरीत 20 दिवस दुकानांचे मालक आणि सेल्समन असे 700 जण कायमस्वरूपी राहतील. दररोज 8 ते 10 हजार ग्राहक येथे येणे अपेक्षित आहेत. त्यातून 8 ते 10 क ोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते. आतापर्यंत पुणे, मुंबई, नागपूर व नाशकात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

वस्त्रांचे वैविध्य : प्रदर्शनात 200 रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंतची वस्त्रे उपलब्ध होतील. राजस्थान हातमाग मंडळाची 7 हजार आरसे असणारी 40 हजारांची शाल, 50 हजारांची पश्मिना शाल आणि 50 हजारात देखणी पश्मिना साडीही उपलब्ध असेल. प्रत्येक ग्राहकाला खरेदीत 20 टक्के सूट मिळेल.

हे आमचे ड्रीम प्रोजेक्ट

इंद्रायणी हँडलूम्सच्या वतीने आम्ही आतापर्यंत लहान-मोठी अनेक प्रदर्शने आयोजित केली आहेत. त्यास मिळालेल्या प्रतिसादाची माहिती आमचे व्यवस्थापकीय संचालक एन. बी. डावर यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाला दिली. शहराचे महत्त्वही पटवून दिले. त्यामुळे येथे प्रदर्शनासाठी परवानगी मिळाली. हे आमचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. अनेक वर्षांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे.
विकास काटे, विभागीय अधिकारी, इंद्रायणी हँडलूम्स