आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad High Court Bench Notice To Vice Chancellor Chopade

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उढाणप्रकरणी कुलगुरू चोपडेंना खंडपीठाची नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरील उल्हास उढाण यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या कुलगुरू बी. ए. चोपडे यांच्या निर्णयास आव्हान देण्यात आले आहे. खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती व्ही. एल. आंचलिया यांनी कुलगुरू चोपडे यांना नोटीस बजावली आहे. या पदावर नवीन सदस्य नियुक्ती प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे.

उढाण यांची ६ ऑगस्ट २०१४ रोजी तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी नियुक्ती केली होती; परंतु २३ जानेवारीला कुलगुरूंनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले. याविरोधात त्यांनी याचिका दाखल केली. त्यांनी म्हटले आहे, आपणास कुठलीही नोटीस अथवा सूचना न देता सदस्यत्व रद्द केले. कुलपतींना पाठवलेल्या पत्रात कुलगुरूंनी म्हटले आहे, उढाण विद्यापीठ कायदा १९९४ कलम २७ (१) (ड) नुसार पात्रता धारण करत आहेत आणि १२ डिसेंबर २०१४ च्या पत्रान्वये म्हणतात की, उढाण पात्रता धारण करत नाहीत. कुलगुरूंच्या या परस्पर विधानाबद्दल कुलपतींनी २९ डिसेंबर २०१४ च्या पत्रान्वये खुलासा मागवला आहे; परंतु असा खुलासा न करता कुलगुरूंनी सदस्यत्व रद्द केले, जे विद्यापीठ कायदा १९९४ च्या तरतुदीविरोधात आहे, असा युक्तिवाद उढाण यांचे वकील शंभुराजे देशमुख यांनी केला.