आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी परीक्षेला सुरुवात; पहिला दिवस कॉपीमुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या बारावी बोर्ड परीक्षेस गुरुवारपासून सुरुवात झाली. ही परीक्षा म्हणजे करिअर मधला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे सर्वच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. पहिला पेपर मराठीचा असल्याने गर्दी कमी असली तरी परीक्षेचे दडपण विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर जाणवत होते. शहरातील महाविद्यालयात कॉपीमुक्त परीक्षा पार पडल्याचे निदर्शनास आले.

‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर पाहणी केली असता सकाळी 10 वाजता मौलाना आझाद महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक बैठक क्रमांक शोधण्याच्या तयारीत दिसून आले. गोदावरी पब्लिक स्कूल, न्यू हायस्कूल, धर्मवीर संभाजी विद्यालय, वेणुताई चव्हाण विद्यालय, जिजामाता अशा सर्वच महाविद्यालयांत शांततेत परीक्षा सुरू होती. एकाही विद्यार्थ्यांकडे कॉपी दिसून आली नसल्याचे परीक्षा मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी सांगितले

परीक्षार्थी कमी : मराठी पहिला पेपर होता. तसेच भाषा विषयाचा पेपर असून तो पर्यायी विषय असल्याने कमी प्रमाणात विद्यार्थी संख्या होती. मात्र शुक्रवारी इंग्रजी विषयाचा पेपर असून तो आवश्यकच असल्याने विद्यार्थी संख्या मोठय़ा प्रमाणात राहणार असल्याचे सर्वच केंद्रप्रमुखांनी सांगितले.

अग्रलेख, बातमी अवघड प्रश्न : मराठीचा पेपर असल्याने हा विषय सर्वांनाच सोपा होता, मात्र प्रश्न क्रमांक सात अ मधील अग्रलेख आणि बातमी यातील फरक स्पष्ट करा, हा प्रश्न जास्तच अवघड असल्याचे प्रतिभा खंबाट हिने सांगितले, तर प्रश्न क्रमांक चार अ मधील गुंडगुळ्याच्या माळावरून जाताना तुकारामांच्या मनात कोणकोणते विचार येत होते हा प्रश्न गीता काळे हिला अवघड गेला, तर किरण चव्हाण व प्रमिला भालेराव या दोघांना हा पेपर अवघड गेल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

पालकांचा ठिय्या : परीक्षा सुरू होण्याच्या एक तास अगोदर विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालकही आले होते. परीक्षा तीन तास होती. मात्र पालकांनी चार तास परीक्षा केंद्राच्या बाहेर बसून ठिय्या केला होता.

वाळूज परिसरातील बजाजनगरातील दोन केंद्रांवरून आज 314 विद्यार्थांनी मराठी विषयाचा पेपर दिला. पाच विद्यार्थी गैरहजर होते. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी कें द्रांवर कडक बंदोबस्त होता. अपंगत्वावर मात करत स्नेहल मोरे हिने तनवाणी क निष्ठ महाविद्यालयातील केंद्रात परीक्षा दिली.