आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापाने फणफणणार्‍या परीक्षार्थीवर केंद्रप्रमुखाचे तातडीचे औषधोपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - परीक्षागृहाच्या व्हरांड्यात विद्यार्थ्यांच्या चपला, जोड्यांच्या शेजारीच एका विद्यार्थ्याने अंग टाकले होते. तो तापाने फणफणत होता. बारावीची परीक्षा देण्यासाठी तो आला होता; पण त्याला नीट बसताही येत नव्हते. अशा अवस्थेत केंद्रप्रमुखाने त्याला पाहिले. स्वत:च्या केबिनमध्ये आणले. चहा, बिस्किटे खाऊ घातली. औषध दिले. अध्र्या तासाने तो स्वस्थ झाला आणि दोन तासांत त्याने पेपर सोडवला. देवासारखा धावून आलेल्या शिक्षकाची ममता आणि मानवतेचे दर्शन घडल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टळले. त्याचे नाव रामदास देविदास बुट्टे.

गोदावरी शाळेचा विद्यार्थी रामदास बुट्टे (प्रवेशपत्र क्र. आर. ओ. 50751) बुधवारपासूनच आजारी आहे. आज बारावीची परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर मराठीचा. सकाळपासूनच तो तापाने फणफणत होता. तशाही स्थितीत तो रोजाबागेतील मौलाना आझाद कॉलेजच्या तिसर्‍या माळ्यावर चढला. कसाबसा तो परीक्षागृहात बसला; पण त्याला काही सुचेना. नीट बसताही येईना. परीक्षागृहातील शिक्षकाने त्याला घरी जाण्याचा दिलेला सल्ला त्याने धुडकावला. कारण ही परीक्षा त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी होती. परीक्षागृहातील परीक्षकाने त्याला आराम करण्याचा सल्ला दिला. मात्र, बाहेर जाण्याच्या मन:स्थितीत नसल्याने हॉलच्या व्हरांड्यात विद्यार्थ्यांनी चपला, जोडे काढले होते, तेथेच त्याने अंग टाकले.

या वेळी पाहणीसाठी केंद्रावर आलेले परीक्षा केंद्रप्रमुख प्रा. ईश्वर मोरे यांना तो अशा विचित्र अवस्थेत दिसला. त्यांनी रामदासला खालच्या माळ्यावरील स्वत:च्या केबिनमध्ये आणले. त्याला चहा, बिस्किटे खाऊ घातली. फार्मसीमधून औषध मागवले. ते त्याला दिले. अर्धा तास विश्रांती घ्यायला लावली. आरामानंतर रामदासला बरे वाटू लागले. त्यानंतर तो पुन्हा पेपर सोडवू लागला. दोन तासांत त्याने 80 पैकी 70 गुणांचा पेपरही सोडवला. रामदासचा अभ्यास पूर्ण झाला होता. मोरे यांच्यातील ‘शिक्षक’ जागा झाल्याने आणि त्यांनी मानवतेच्या भावनेतून मदत केल्याने रामदास पेपर देऊ शकला.