औरंगाबाद: वाळूज येथील आयसिम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी वाळूज येथील बीएमसी इलेक्ट्रोप्लास्ट कंपनीतील तंत्रज्ञांच्या टीमसोबत काम करून वीजतारांना लागणारे आगळेवेगळे शोल्डर तयार केले आहे. तेही २५ टक्के स्वस्त अन् वजनाने ५० टक्के हलके. लोखंडासह इतर धातूंना पर्यायी असे शीट मोल्डेड कंपोनंट वापरून तयार केले आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणाचे लवकरच मोठ्या प्रमाणावर कंपनी उत्पादनही करणार आहे.
मेकॅनिकल शाखेच्या अंतिम वर्षात शिकणारे अक्रम पटेल, साजिद शहा, रिंकी राठोड, साजेद मुबशीर खान या तीन विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाचा प्रोजेक्ट घेऊन वाळूजच्या बीएमसी इलेक्ट्रोप्लास्टमधील टीमच्या मदतीने हे उपकरण तयार केले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश मगरे हे दरवर्षी शहरातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे संशोधनाची संधी देतात.
या कंपनीत शहरातील केंद्र सरकारचे प्रमाणित विकास संशोधन केंद्र आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ही संधी दिली जाते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण प्रोजेक्ट करण्यात आला. आगळ्यावेगळ्या प्रोजेक्टचे रूपांतर लवकरच उत्पादनाच्या श्रृखंलेत होणार असल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतात पहिलाच प्रयोग नेमके काय आहे संशोधन ?
याचारही विद्यार्थ्यांना कंपनीने संशोधनासाठी पायाभूत सुविधा दिल्या, ज्यात अर्थसाहाय्य हा मोठा भागही आहे. कंपनीचे मालक काही तंत्रज्ञांनी विद्यार्थ्यांना हा प्रोजेक्ट संशोधनासाठी दिला. तसेच गाइडलाइनही दिली. वीज खांबांना आणि वीजतारांना धरून ठेवणारे लोखंडी शोल्डर महत्त्वाचे असते.
हे शोल्डर लोखंड अथवा कोणताही धातू वापरता कमी वजनाचे पण त्यापेक्षा टिकाऊ, वजनाने हलके अन् कमी किमतीत करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना देण्यात आले. धातूला पर्याय ठरणारे शीटमेटल कंपाउंड (एफएमसी) यात वापरले. सहा महिन्यांच्या संशोधनातून अखेर २५ टक्के स्वस्त, ५० टक्के वजनाने कमी आणि लोखंडापेक्षा दिसायला सुबक एकाच साच्यातून निघणारे शोल्डर तयार झाले.
- केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ सायन्सने प्रमाणित केलेले संशोधन केंद्र असलेली आमची मराठवाड्यातील एकमेव कंपनी आहे. आम्ही संशोधनासाठी पायाभूत सुविधा आणि मार्गदर्शन केले. या मुलांनी भारतात हा पहिलाच कौतुकास्पद प्रयोग करून लोखंडाच्या उत्पादनाला अनोखा पर्याय दिला आहे.
- गिरीश मगरे, व्यवस्थापकीय संचालक, बीएमसी इलेक्ट्रोप्लास्ट