आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादची ओळख बनलेला माझा रुबाब दुभंगला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्हा घोड्यांचे नैसर्गिक आयुष्य असतेच मुळी 25 ते 30 वर्षांचे. पुढील नोव्हेंबर महिन्यात मी 31 वर्षांचा होणार होतो; पण मागच्या आठवड्यापासूनच मला आता आपले फार दिवस राहिले नाहीत हे कळून चुकले. माझ्या पोटाला भगदाड पडले. फायबरच ते. त्याचे आयुष्य कितीसे असणार? पण कुणीतरी हालचाली करतील, दुरुस्ती करतील, अशी अपेक्षाही होती. काही झब्बे घालणारे लोक येऊन गेले, पाहून गेले. त्यांचा आव पाहून मला जगता येईल असे वाटत होते; पण नशिबात नव्हते. बुधवारी रात्री काही टारगटांनी माझ्या बाजूच्या चौथर्‍यावरच्या तुटक्या टाइल्स उचकटल्या आणि घाव घालायला सुरुवात केली. पोटाला पडलेले भगदाड वाढवत त्यांनी माझे कंबरडेच मोडले. मेवाडच्या वाळवंटात मागच्या दोन पायांवर उभे राहून फुरफुरणारे माझे रूप इथे होते. मला 1576 चे ते थरारक दिवस आठवले. वीर योद्धा महाराणा प्रताप माझ्यावर मांड ठोकून हल्दीघाटीची लढाई निकराने लढत होते. अकबराच्या फौजेचा कडवा मुकाबला करीत होते. अकबर हत्तीवर स्वार होता. महाराणांच्या इशार्‍यावर मी माझ्या पुढच्या टापा उचलत त्या गजराजाच्या गंडस्थळावर मारल्या. तीच वेळ साधत महाराणांनी अकबराच्या दिशेने भाला फेकला. तो वाचला; पण नंतर त्याच्या पिसाळलेल्या सैनिकांनी माझ्यावर घाव घातले. माझा एक पाय जायबंदी झाला. तरीही महाराणांना सुरक्षित नेण्याचे काम मी केले आणि मगच प्राण सोडले. काल जेव्हा माझ्या पोटावर टाइल्सचे घाव बसत होते, तेव्हा मला ते घाव आठवले. घाव सहन करून मरणे हेच माझ्या नशिबात असावे..

1992 मध्ये मला या चौकात आणून उभे केले. फायबरचा असलो तरी काय रुबाब होता तेव्हा ! सावरकर चौक, जवाहर कॉलनीकडे जाणार्‍या चौकाला पाहता पाहता माझे नाव पडले. मी कोण, कुठला मेवाडमधला, पण मी या औरंगाबादची ओळख बनलो. कोणीही पत्ता सांगायचा तो चेतक घोड्याचाच. येणारा प्रत्येक जण माझ्याकडे कुतूहलाने बघायचा तेव्हा ऊर अभिमानाने भरून यायचे. याच चौकात माझ्यासमोर पिढय़ा लहानाच्या मोठय़ा झाल्या. दप्तरे वागवत शाळेत जाणारी मुले पाहता पाहता आता चेतक घोड्याजवळ कंपनीत जाण्यासाठी बसची वाट पाहण्याएवढी मोठी झाली. 30 वर्षांत माझ्या चौकाच्या आजूबाजूच्या वसाहती बदलल्या, झपाट्याने वाढल्या. चुकून माकून दोन-तीन वेळा मला रंगरंगोटी झाली तेवढीच; पण नंतर तेही बंद झाले. जयभवानी शाळेत जाणारी बच्चेकंपनी इतिहासातील हल्दी घाटीचा धडा आठवत जेव्हा माझ्याकडे बघायची तेव्हा मी हरखून जायचा; पण बुधवारी रात्रीपासून माझं इथलं अस्तित्व संपलंय. आता माझे चारही पाय जमिनीला टेकले आहेत. मातीत मिसळणे हेच माझ्या ललाटी असावे!
(शब्दांकन : महेश देशमुख)

पुन्हा चेतकच
मनपाची आर्थिक स्थिती बिकट असली तरी जनभावनांचा आदर म्हणून येथे चेतकच उभारण्याचा प्रयत्न करीन. - सुरेंद्र कुलकर्णी, नगरसेवक