आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हजारो गुंतवणूकदारांना अडीचशे कोटींचा चुना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ठरावीक मुदतीत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत हजारो गुंतवणूकदारांना जवळपास अडीचशे कोटी रुपयांना गंडवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. स्वामी समर्थ इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस या नावाखाली उघडलेल्या संस्थेच्या माध्यमातून विजय प्रभाकर खोडगे (रा. हडको, एन-9) या भामट्याने हा प्रकार केला. संस्थेचा संचालक असलेला खोडगे मागील दीड महिन्यापासून फरार असून, त्याच्याविरुद्ध 37 गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी तपास सुरू असतानाच शुक्रवारी आणखी 100 गुंतवणूकदारांनी पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन आपबीती सांगितली.
हडको, एन-9 मधील पवननगरात असलेल्या के - 64/5 या आपल्या राहत्या घरातच दोन वर्षांपूर्वी खोडगे याने संस्थेचे कार्यालय थाटले. दर्शनी भागात संस्थेचे नाव कोरलेले होते. वेगवेगळ्या योजना राबवून त्याने गुंतवणूकदारांना आकर्षित केले. ठरावीक मुदतीत दामदुप्पट करून देण्याच्या प्रलोभनाला बळी पडलेल्या लोकांनी त्याच्याकडे पैसा गुंतवला. सुरुवातीला काही जणांना वाढीव पैसा मिळालदेखील, परंतु गेल्या 18 एप्रिलच्या सुमारास खोडगे फरार झाला. हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी वाट पाहून अखेर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर औरंगाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेत 37 गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध सुरू केला. त्यातच शुक्रवारी 100 गुंतवणूकदार पोलिस उपायुक्तांकडे गेले.
घार्गे यांनी त्यांना आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे पाठवले. आधी दाखल तक्रारीवर गुन्हे शाखा तपास करत असल्याने आघाव यांनी त्यांना गुन्हे शाखेचे निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्याकडे पाठवले.
चार महिन्यांत दामदुप्पट
चार महिन्यांसाठी कंपनीत 1 लाख रुपये ठेवल्यास दामदुप्पट दिले जाईल, अशी योजना खोडगेने सुरुवातीला आणली. या काळातील गुंतवणूकदारांना त्याने दामदुप्पट म्हणजे 4 लाख रुपये परतावा दिला.
साडेसहा महिन्यांत दामदुप्पट
पहिली योजना यशस्वी झाल्यानंतर खोडगेने दुसरी साडेसहा महिने कालावधीची योजना आणली. यात मराठवाड्यासह खान्देश, विदर्भातील गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवला. या योजनेत पैसे ठेवण्यासाठी 5 लाख रुपयांची अट होती. त्यानुसार ही गुंतवणूक झाली. सुरुवातीला काही महिने गुंतवणूकदारांना परतावाही मिळाला.
12 महिन्यांची योजना
पहिल्या दोन योजना सुरू ठेवत खोडगे याने 12 महिन्यांची योजना राबवली. ठेवीचा आकडाही वाढवण्यात आला. 10 लाख रुपये ठेवल्यास दामदुप्पट मिळतील, अशी अट होती. परंतु या योजनेत मात्र तो गुंतवणूकदारांना परतावा देऊ शकला नाही. मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांना दिलेले दामदुपटीचे चेक बाऊन्स होत असल्याने खोडगेचे पितळ उघडे पडले.
आत्महत्येचा प्रयत्न आणि पोबारा
बारा महिन्यांसाठी दहा लाख ठेवीवर दामदुप्पट देण्याच्या योजनेत गुंतवणूकदारांना दिलेले चेक बाउन्स झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी खोडगेचे घर गाठण्यास सुरूवात केली. आयकर विभागाने माझा सर्व पैसा लॉक केल्याचे सांगून खोडगे त्यांना बँकेत चेक न टाकण्याचे सांगत होता. रोख पैसे देण्याचे आश्वासन देत तो वेळ मारून नेत होता. त्याचे ‘तारीख पे तारीख’ सुरू होते आणि गुंतवणूकदारांचा तगादा वाढत होता. त्यामुळे एकदा तर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही खोडगेने केला. या प्रकारामुळे खोडगेची पत्नी घाबरली. तिने माहेरी संपर्क साधला. चार महिन्यांच्या मुलीसह ती भावासोबत जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे निघून गेली. इकडे औरंगाबादेत गुंतवणूकदारांचा वाढता रोष पाहून 18 एप्रिलच्या सुमारास मध्यरात्रीच खोडगेने पोबारा केला. आई-वडील व अविवाहित बहिणीसह तो पळून गेला.

अशी पाडली भुरळ
गुंतवणूकदारांना आकर्षित करून घेण्यासाठी खोडगे याने नामी शक्कल लढवली होती. वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम तो पंचतारांकित हॉटेलात करत असे. संपर्कातील मित्र, नातेवाइकांना तो त्यासाठी आमंत्रित करत असे. आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवसही त्याने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा केला. या वेळी त्याने वडिलांना 92 लाखांची कार भेट दिली होती. अशा कार्यक्रमात आई व पत्नीच्या अंगावरील दागिने, खोडगेचा थाटमाट पाहून गुंतवणूकदारांना भुरळ पडायची. त्यातूनच पुढे या लोकांनी खोडगेच्या संस्थेत गुंतवणूक केली.
कोण हा विजय खोडगे
खान्देशातील अमळनेर तालुक्यातील उंदीरखेडे या गावचा मूळ रहिवासी.
1972 मधील दुष्काळाच्या काळात त्याचे वडील औरंगाबादेत आले. ग्रॅटलायझर कारखान्यात त्यांनी काही दिवस काम केले. पुढे सॅनिटरी वेअर विकण्याचा व्यवसाय सुरू केला. दिवसा व्यवसाय आणि रात्री कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून ते काम करत. सिडकोतील बळीराम पाटील शाळेत शिकलेल्या खोडगे याने पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आहे. टेलिफोन आॅपरेटर म्हणून जॉब करत त्याने शिक्षण पूर्ण केले, असे त्याच्या एका नातलगाने सांगितले.
गुंतवणूकदारांनी पुढे यावे

खोडगेविरुद्ध 37 लोकांनी तक्रार दिली आहे. त्याचा शोध सुरू आहे. पुणे, खान्देशात शोध घेऊनही तो हाती लागला नाही. फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे आणि पोलिसांशी संपर्क साधावा. त्यातून काही सुगावा लागू शकतो.
रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा
तक्रार घेऊन लोक आले

खोडगेच्या प्रकरणात काही लोक तक्रार घेऊन आले होते. त्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याचा सल्ला मी दिला. या शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव पुढील कार्यवाही करतील.
सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त
माझा-त्याचा संबंध तुटला

माझी व माझ्या नातलगांची खोडगेने फसवणूक केली. आकडा खूप मोठा आहे. सांगून काय फायदा. मुलीला मी माहेरी आणून घेतले. खोडगेचा व आमचा काहीही संबंध राहिलेला नाही. मी त्याच्याविरुद्ध कोर्टात तक्रार दिली आहे.
विलास वाणी, पारोळा (खोडगे याचे सासरे)
एमएलएमचे फॅड । नगरमधील 9 हजार लोकांची फसवणूक; तिघे अटकेत
‘नापतोल’चे गोलमाल सुरूच, अनेकांची फसवणूक
बनावट धनादेश देऊन 73 लाखांची फसवणूक