आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे औरंगाबाद देशातील 5 वे शहर; शेतकरी म्हणाला, डॉक्टर माझ्यासाठी देव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. उन्मेष टाकळकर यांना पेढा भरवताना श्रीमंत थोरात. छाया : मनोज पराती - Divya Marathi
डॉ. उन्मेष टाकळकर यांना पेढा भरवताना श्रीमंत थोरात. छाया : मनोज पराती
औरंगाबाद - माझे वय अवघे पंचेचाळीस, पण पाच वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली. शेतीत फार काही पिकत नसल्याने ट्रक, ट्रॅक्टर चालवण्याची कामे केली. आरोग्याकडे फार लक्ष देता आले नाही. शेवटी हृदय निकामीच झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मी गरीब असलो तरीही आज खऱ्या अर्थाने श्रीमंत झालो. मी ईश्वर पाहिला नाही, माझ्यासाठी डॉ. उन्मेष टाकळकर हेच देव आहेत. वर्षभर आराम केल्यावर पुन्हा शेतात काम करून नवे पीक घेईन. पुढे स्वत:ला जपेन...या उत्स्फूर्त भावना आहेत नवीन हृदय मिळालेले शेतकरी श्रीमंत थोरात यांच्या.
 
शहरातील सिग्मा रुग्णालयातील दहा डॉक्टरांच्या टीमने मराठवाड्यातील पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण केले. तेही मोफत. कारण एका गरीब शेतकऱ्यावर ही शस्त्रक्रिया झाली. त्यावरील पंचवीस लाख रुपये खर्च रुग्णालयानेच केला. ब्रेनडेड शिक्षकाचे हृदय त्यांना मिळाले. बुधवारी (१२ एप्रिल) नवे हृदय घेऊन हा शेतकरी घरी गेला. दोन महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली. श्रीमंत थोरात यांच्या नातेवाइकांनी आनंदाश्रू ढाळत सर्वांचे तोंड गोड केले.
 
या वेळी सिग्मा रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष टाकळकर, हृदयरोगतज्ज्ञ डॉ.आनंद देवधर, डॉ. मनीषा टाकळकर, डॉ. आशिष देशपांडे, डॉ. शिरीष देशमुख, डॉ.अजय रोटे, डॉ. राजकुमार घुमरे, भूलतज्ञ डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. पुष्पा कोडलीकेरी यांची उपस्थिती होती.
 
हेही हृदय माझेच वाटत आहे: मराठवाड्यातीलपहिले हृदय प्रत्यारोपण यशस्वी झाले. सिग्माच्या टीमने ही शस्त्रक्रिया मोफत केली. पांढरा शुभ्र नेहरू शर्ट- पायजमा आणि चेहऱ्यावर नवे आयुष्य मिळाल्याचे कृतार्थ भाव असलेले अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील खानापूर येथील शेतकरी श्रीमंत थोरात यांनी “दिव्य मराठी’शी संवाद साधला तेव्हा थोरातांसह डॉक्टरांचेही डोळे पाणावले.
 
मी ईश्वर पाहिला नाही, माझ्यासाठी डॉक्टर टाकळकरच देव आहेत. माझे जुने हृदय खराब झाल्याचे कळले तेव्हा वाईट वाटले. आता सर्व काही संपले असे वाटत असतानाच सिग्मातच मला दुसरे हृदय मिळाले. हे नवे हृदय माझेच वाटत आहे. मी आता सर्व काही खाऊ शकतो. मला पूर्वी दम लागत होता. ते थांबले आहे. जेवण जात नव्हते. अनेक रात्री मी झोपलो नव्हतो. आता जेवणही जात आहे. झोपही पडल्या पडल्या लागते, अशा भावना व्यक्त करत असतानाच श्रीमंत यांचा कंठ दाटून आला आणि त्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांचे अश्रू पुसणारी पत्नी नंदाबाई थोरात यांनाही गहिवरून आले.

जोमाने नवे पीक घेईन
डॉक्टरच माझा देव, मी आता काहीही खाऊ शकतो, दम लागत नाही, हलके आणि खूप प्रसन्न वाटत आहे. वर्षभर आराम केला की नवे पीक घेईन.
- श्रीमंत थोरात, शेतकरी.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, तीन हृदये मिसमॅच, चौथे जुळले
 
बातम्या आणखी आहेत...