आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक उमेदवार ठरवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना, कुणाचे नशीब फळफळणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अनेक जण गेल्या काही दिवसांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. तथापि, दिल्ली दरबाराच्या हिरव्या कंदिलानंतरच मंगळवारी रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी कुणा एकाचे नशीब फळफळणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रात्री उशिरा विमानाने दिल्लीला रवाना झाले असून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर सकाळी कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर होणार आहे.

सोमवार आणि मंगळवारीही सायंकाळी राज्य पातळीवरील नेत्यांची मुंबईत बैठक झाली. मात्र, यात मतैक्य न झाल्याने अखेर दिल्लीश्वरांकडे निर्णय सोपवण्याचा निर्णय झाला. त्यासाठी मुख्यमंत्री स्वत: दिल्लीकडे रवाना झाले. प्रमोद राठोड, सुभाष झांबड आणि जालन्याचे संजय लाखे पाटील यांची नावे दिल्लीपर्यंत गेली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सर्व इच्छुक मुंबईत डेरेदाखल झाले आहेत. रात्री उशिरा निर्णय झाला तर काँग्रेसचा उमेदवार दुपारी 3 वाजेपर्यंत पोहचून अर्ज सादर करू शकेल. बी फॉर्म छाननीच्या वेळी दिला तरी चालेल. उमेदवारी जाहीर होण्यास दुपार झाली तर मात्र शेवटच्या दिवशी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी काँग्रेसची उमेदवारी दाखल होईल. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (बाबूराव कुलकर्णी, जालना), नारायण राणे (प्रमोद राठोड, औरंगाबाद), तसेच शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा व अब्दुल सत्तार (सुभाष झांबड) यांच्या मर्जीतील कार्यकर्त्याला उमेदवारी मिळवून देण्यासाठी अडून बसले आहेत.

झांबड यांना मुख्यमंत्र्यांचाच आक्षेप?
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झांबड यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यास स्वत: मुख्यमंत्री चव्हाण यांनी बैठकीत आक्षेप घेतल्याचे समजते. निष्ठावान कार्यकर्ते असताना बाहेरून आलेल्याला कशासाठी उमेदवारी द्यायची, असा सवाल त्यांनी केल्याचे समजते. आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम यांनी बैठकीतील चर्चेबद्दल भाष्य करण्यास नकार दिला.