आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद-जालना होणार राष्ट्रीय महामार्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील दुर्लक्षित असलेला जालना जिल्हा राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे. औरंगाबाद- मलकापूर हा 160 किमीचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग करण्याची अधिसूचना शुक्रवारी काढण्यात आली असून वर्षभरात प्रत्यक्ष काम सुरू होईल.

नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग व बंदरे विभागाचा पदभार स्वीकारताच 6 जून रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांची दिल्लीत बैठक घेतली होती. राज्यातील प्रकल्प संचालकांकडून आलेले प्रस्ताव केवळ राजकीय वादामध्ये अडवून ठेवण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर गडकरी यांनी अधिकार्‍यांची कानउघाडणी करून प्रस्ताव मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भातील वृत्त दै.‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते.

या महामार्गासंबंधीचे पत्र विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार आणि जालन्याचे जिल्हाधिकारी ए. एस. रंगानायक यांना प्रकल्प संचालकांनी पाठवले असून हा मार्ग केंद्राच्या ताब्यात देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

औरंगाबाद-मलकापूर महामार्ग 160 किमीचा
औरंगाबाद-जालना रोडवरील केम्ब्रिज शाळेसमोरील झाल्टा फाट्यापासून सुरू होणारा राष्ट्रीय महामार्ग 160 किलोमीटरचा आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार होणारा रस्ता सहापदरी आहे. यात दोन ते तीन उड्डाणपूल, काही भुयारी मार्ग आहेत.

महामार्गाच्या कक्षेतील गावे
0औरंगाबाद 0जालना 0देऊळगाव राजा 0चिखली 0बुलडाणा 0मलकापूर
या गावांतून महामार्ग जाणार. जालना शहरातून जाणारा पहिलाच राष्ट्रीय महामार्ग.

डिसेंबर 2015 पूर्वी काम सुरू
औरंगाबाद - मलकापूर रस्त्याच्या मंजुरीचे नोटिफिकेशन आजच मिळाले आहे. सध्या याशिवाय कोणतेही काम मंजूर झालेले नाही. डिसेंबर 2015 पूर्वी या रस्त्याचे काम सुरू होऊ शकते. जे. यू. चामरगोरे, प्रकल्प संचालक, एनएचएआय
राज्याची मालकी संपुष्टात.

विकासाचा मार्ग
केंद्र शासनाने या महामार्गाच्या मंजुरीचे नोटिफिकेशन शुक्रवारी (दि. 4 जुलै) काढले. यामुळे हा रस्ता आता केंद्राच्या मालकीचा झाला असून राज्य सरकारला या मार्गावर नवीन कामे करताच येणार नाहीत. महामार्ग पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद ते मलकापूरदरम्यान प्रत्येक साठ किलोमीटर अंतरावर एक टोल नाका असणार आहे.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)