आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Jilha Parishad Set Up Fire Brigad System

औरंगाबाद जिल्हा परिषद उभारणार अग्निशमन यंत्रणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील इमारती, मालमत्ता अथवा ग्रामीण भागात आग लागल्यास ती विझवण्यासाठी मनपावर अवलंबून राहावे लागत असल्याने स्वत:ची अग्निशमन यंत्रणा उभारण्याचा ठराव जिल्हा परिषदेने बुधवारी स्थायीच्या बैठकीत संमत केला.

जि. प. अध्यक्षा नाहिदाबानो पठाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. समिती सदस्य अनिल चोरडिया म्हणाले की, खडकनारळा येथे दोन दिवसांपूर्वी शेतात आग लागली होती. ती विझवण्यासाठी मनपाच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले, पण सुरुवातीला त्यांनी जि. प. कडे आधीची एक ते दीड कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. पण विनंती केल्यावर यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. एखाद्या लांबच्या गावात अशी परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा परिषदेकडे अशी यंत्रणा आवश्यक असल्याचे सांगून तसा ठरावही त्यांनी मांडला. पालोदकर यांनी अनुमोदन दिले.

काही गावांत प्रशासनाने टंचाईची कामे केली नसल्याने गावकर्‍यांनी लोकसहभागातून बोअर घेतले आहेत. त्यावर प्रशासनाने हातपंप बसवण्याचा ठराव पालोदकर यांनी मांडला. त्याला दीपक राजपूत यांनी अनुमोदन दिले. बोअरची जागा ग्रामपंचायतीच्या नावे करून त्यावर तत्काळ हातपंप बसवून देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिले. कचनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची लवकरच दुरुस्ती करणार असल्याचेही बनकर यांनी सांगितले.

समाजकल्याण अधिकारी परतीला अटकाव

अतिरिक्त कारभार सांभाळणार्‍या समाजकल्याण अधिकारी जयर्शी सोनकवडे कोणत्याच बैठकीला उपस्थित राहत नसल्याचा अरोप दीपक राजपूत यांनी केला. बोगस वसतिगृहे सुरू असून त्यांची तपासणी होत नाही. अस्तित्वात नसलेल्या वसतिगृहाला निधी मिळतो. या बाबी त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर सभागृहाने त्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना समज देण्याची सूचना करून बनकर यांनी विषय टाळला.

रोहयो कामावरून गरमागरमी

पाच महिन्यांपूर्वी 40 लाख रुपयांच्या औषध खरेदीला मान्यता देऊनही एप्रिलमध्ये औषध खरेदीचा प्रस्ताव का ठेवला, याची विचारणा करत पालोदकर यांनी, तर रोहयोच्या कामांचे ई-मस्टरमुळे मजुरांना काम मिळत नाही तसेच कामे होऊनही तांत्रिक अभियंता आणि ग्रामसेवक मस्टरवर स्वाक्षर्‍या करत नसल्याचे दीपक राजपूत यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, राजपूत आणि बनकर यांच्यात काही वेळ शाब्दिक चकमक उडाली.