आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकलठाणा-नगरनाका पूल हवा ; सर्वपक्षीय आमदारांनी केली एकमुखी मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तीन वर्षांपूर्वी फाइलबंद झालेला चिकलठाणा ते नगर नाका उड्डाणपुलाचा प्रस्ताव पुन्हा अवतरला. कुठल्याही परिस्थितीत हा पूल उभारावा, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी शनिवारी सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे केली. त्याला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनीही पाठिंबा दिला.
राज्य रस्ते विकास मंडळातर्फे क्रांती चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन शनिवारी दुपारी क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, डॉ. कल्याण काळे, संजय शिरसाट, किशनचंद तनवाणी, एम. एम. शेख, सतीश चव्हाण उपस्थित होते. डॉ. काळे, चव्हाण यांनी या जंबो पुलाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, औरंगाबाद शहरात जालना रोड सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. शहरात येणारी आणि जाणारी हजारो वाहने याच रस्त्यावरून जातात. सेव्हन हिल, क्रांती चौक येथे आता उड्डाणपूल झाले आहेत. मोंढा नाका, जळगाव टी पॉइंट येथे पूल प्रस्तावित आहेत; पण त्याने वाहतुकीची समस्या सुटणार नाही. म्हणून चिकलठाणा विमानतळ ते नगर नाक्यापर्यंत एकच पूल उभारावा. त्यांच्या या मागणीला सर्व आमदारांनी पाठिंबा दिला. काळाची गरज म्हणून अशा पुलांचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे फौजिया खान यांनीही स्पष्ट केले.
यावेळी आमदार बदामराव पंडित, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस कदीर मौलाना, शहराध्यक्ष मुश्ताक अहेमद, बीड जिल्हा परिषदेचे सभापती संदीप क्षीरसागर, युद्धजित पंडित यांची उपस्थिती होती. नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले. रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष विपिन र्शीमाळी यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापकीय संचालक पद्मनाभ गोडबोले यांनी आभार मानले.
काय होता 2009 चा प्रस्ताव - दिलीप बंड 2009 मध्ये मनपा, विभागीय आयुक्त असताना त्यांनी चिकलठाणा-नगर नाका उड्डाणपूल उभारावा असा प्रस्ताव तयार केला होता. सुमारे 10 किमी लांबीच्या या पूल उभारणीसाठी 200 कोटी रु. खर्च होतील, असेही त्यात म्हटले होते. मात्र लोकप्रतिनिधीसह अनेकांनी विरोध दर्शविल्याने तो थंडबस्त्यात गेला.
काय झाले प्रस्तावाचे - हा प्रस्ताव औरंगाबादेत होणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडण्याचीही बंड यांची तयारी होती; पण सर्व स्तरातून त्यास जोरदार विरोध झाला. मोठय़ा पुलाची गरज नाही, असे व्यापारी वर्ग, व्यावसायिकांनी बंड यांना सांगितले. लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा नव्हता. त्यामुळे प्रस्ताव फाइलबंद करण्यात आला.
कोण काय म्हणाले?
राजेश टोपे - औरंगाबाद हे भविष्यातील अत्यंत महत्त्वाचे शहर राहणार आहे. येथील वाहतुकीचा ताण मोठय़ा उड्डाणपुलांची गरज आहे. असे पूल झाले तर लोक शहराबाहेर राहू शकतील. पर्यायाने शहरातील जमीन, फ्लॅट्सचे भाव कमी होतील. ’’
राजेंद्र दर्डा - सेंट फ्रान्सिस शाळेसमोर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पादचारी पूल करावा. रुंदीकरणानंतरचे रस्ते पार्किंगमुक्त करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. समांतर जलवाहिनीचे पाणी आमच्या काळात लोकांना मिळेल, असे वाटत नाही. ’’
फौजिया खान - युरोपीय राष्ट्रांमध्ये दोन-तीन स्तरांचे उड्डाणपूल असतात. तशाच धर्तीवर औरंगाबादेतही पुलांची उभारणी होणे गरजेचे आहे. येथील रस्ते रुंद होत असताना दोन्ही बाजूंनी पार्किंग होत आहे. महापौर अनिता घोडेले, आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी त्याकडे लक्ष द्यावे.’’
चंद्रकांत खैरे - औरंगाबादच्या विकासासाठी 200 कोटी रुपये राज्य शासनाने द्यावेत. हैदराबादच्या धर्तीवर येथेही मोठा उड्डाणपूल झाला पाहिजे. नगर नाका-गोलवाडी रस्ता रुंदीकरणासाठी लष्कराकडून जागा मिळत नाही, हे दुर्दैव आहे. ’’
नामकरणाचा प्रस्ताव मान्य - क्रांती चौकातील उड्डाणपुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण करण्याची मागणी सर्वपक्षीय आमदारांनी केली. ती मान्य केल्याचे क्षीरसागर म्हणाले. मात्र, यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुतळ्याची उंची वाढवण्याच्या मागणीवर मात्र त्यांनी भाष्य केले नाही.
कठड्यांना लावणार तीन फुटांचे फायबर - क्रांती चौक उड्डाणपूल शनिवारी वाहतुकीसाठी खुला झाला. चौकातील पुतळ्याला संरक्षण मिळावे यासाठी पुलाच्या कठड्याला तीन फूट उंचीचे फायबरचे पत्रे बसवले जाणार असल्याची माहिती पोलिस आयु्क्त संजयकुमार यांनी पत्रकारांना दिली. तसेच मुंबई उच्च् न्यायालयाच्या धर्तीवर जिल्हा न्यायालयात सुरक्षा व्यवस्था वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.