आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खड्डय़ात पडून विदेशी पर्यटक जखमी, घाटीत उपचार सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पर्यटनासाठी शहरात आलेला विदेशी पर्यटक शुक्रवारी (2 ऑगस्ट) रात्री 10 च्या सुमारास रेल्वेस्टेशन रोडवरील फुटपाथच्या मोठ्ठय़ा खड्डय़ात पडून जखमी झाला. टुरिस्ट होमकडे पायी जात असताना हा अपघात घडला. कॅमरन गर्ग (24, रा. अँलान पार्क, स्क्वॉटलँड) असे या पर्यटकाचे नाव असून त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. घाटीत उपचार केल्यानंतर त्याला शनिवारी दुपारी फैज-ए-आम ट्रस्टच्या रुग्णवाहिकेने मुंबईला पाठवण्यात आले.

अजिंठा, वेरूळ, पाणचक्की, बीबी-का-मकबरा अशी विविध पर्यटनस्थळे पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना आता खड्डय़ांतून मार्ग काढत पुढे जावे लागत असल्याचे चित्र आहे. वाहन चालकांनाही जीव मुठीत धरून जावे लागत आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास गर्ग आणि त्याचा मित्र क्रिक डेव्हिड अँगेस हे दोघेही जनशताब्दी रेल्वेतून उतरले. तेथून दोघेही टुरिस्ट होमकडे पायी निघाले. रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने तो फुटपाथवरील पाच फुटांच्या खड्डय़ात पडला. त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे पाहून अँगेसने त्याला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर सकाळी सव्वासहाच्या सुमारास त्याला घाटीत दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी गर्गच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच स्क्वॉटलँडच्या राजदूतावासाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. 29 जुलै रोजी हे दोघेही मुंबईत आले होते. ते आजपासून शहरातील विविध पर्यटनस्थळांची पाहणी करणार होते; परंतु गर्गचा अपघात झाल्याने त्यांना हा दौरा अध्र्यावर सोडावा लागला आहे. मुंबईत त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून गर्गच्या अपघाताची नोंद क्रांती चौक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.