आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेकेदारांनी खड्डय़ांचे खापर फोडले लोकांवर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नगरसेवक-अधिकार्‍यांचे ठेकेदारांशी साटेलोटे असल्यानेच रस्ते खड्डय़ात जातात हा आरोप धादांत खोटा असल्याचा दावा ठेकेदारांच्या प्रतिनिधीने केला आहे. आम्ही तर रस्ते चांगलेच करतो, असे म्हणत त्यांनी खड्डय़ांचे खापर नागरिक आणि मनपावर फोडले आहे. तयार झालेला रस्ता नागरिकांनी कमानी, जलवाहिनीसाठी खोदल्यानेच खड्डय़ात जातो, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनपाचे माजी शहर अभियंता सी. एस. सोनी यांनी ठेकेदारांचा हा दावा हास्यास्पद असल्याचे सांगितले. केवळ नागरिकांच्या खोदकामामुळे रस्ता खराब होतो, असे म्हणणे म्हणजे करदात्यांचा अपमान करण्यासारखेच आहे, असेही त्यांनी बजावले.

कोट्यवधींच्या उलाढालीत मग्न असलेल्या ठेकेदार, अधिकारी आणि नगरसेवकांच्या त्रिकुटाने औरंगाबादकरांचे चालणे मुश्किल करून टाकले आहे. त्यातील ठेकेदारांना खड्डय़ांविषयी काय वाटते, हे खड्डे नेमके का होतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने केला. गेल्या काही वर्षांत शहरातील बहुतांश डांबरीकरणाची कामे करणारे ठेकेदार, आदिनाथ कन्स्ट्रक्शन्सचे संचालक आदिनाथ कटारिया यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी खड्डय़ांसाठी मनपा आणि नागरिकांकडे बोट दाखवले. ते म्हणाले की, दर तीन वर्षांनी रस्त्यावर दोन थर टाकण्याच्या नियमाचे पालन व्हावे.

डांबरीकरण झाल्यावर मंडप, कमानी, जलवाहिनीसाठी खोदकाम थांबले आणि रस्त्यावर पाणी टाकणे थांबले तर खड्डय़ांची संख्या हजार पटींनी कमी होईल.

साटेलोटे अशक्यच
माहिती अधिकारात नागरिक लगेच माहिती घेतात. त्याचबरोबर ई-टेंडरिंग असल्यामुळे ‘रिंग’ होणे आता अशक्य बाब आहे. त्यामुळे अधिकारी किंवा नगरसेवकासोबत ठेकेदारांचे साटेलोटे कसे असू शकते, असा प्रतिप्रश्न कटारिया यांनी केला. गेल्या दोन वर्षांपासून देयके अदा करण्यात आली नाहीत. गतवर्षी करण्यात आलेल्या पॅचवर्कची चौकशी करण्यात आली असता 98 टक्के कामे योग्य असल्याचे समोर आले. साटेलोटे असते तर चौकशीत तसे उघड झाले असते.

शास्त्रोक्त पद्धतीनेच होते काम
रस्त्याचे काम करताना माप मारले जाते, या आरोपाचाही कटारिया यांनी इन्कार केला आहे. ते म्हणाले, सर्व कामे शास्त्रोक्त पद्धतीनेच होतात. काम सुरू असलेल्या ठिकाणाला लागूनच दुसरे काम मिळणार असेल तर ठेकेदार कमी किमतीची निविदा भरतात. दूर असेल तर खर्च वाढतो म्हणून जास्त रकमेची निविदा भरली जाते. प्रसिद्धिमाध्यमांतून मात्र रिंगची चर्चा होते. ती चुकीची आहे.
येथे आहे खड्डय़ांचे मूळ
औरंगाबादेतील 1300 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी किमान 450 किलोमीटर रस्त्यांवर डांबराचे दोन थर (सील कोटिंग) अंथरणे गरजेचे आहे. त्यासाठी 100 कोटींपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. मनपाकडे रस्त्यासाठी 20 ते 25 कोटीच असतात. म्हणजे अवघे 20 टक्केच काम होते आणि उर्वरित 80 टक्के रस्त्यांवर खड्डे पडतात.

दज्रेदार रस्ते तयार करणे हे कर्तव्य

करातून जमा होणारी रक्कम लोकांच्या हितासाठी वापरणे, वाहतुकीसाठी चांगले दर्जेदार रस्ते तयार करणे, मनपाचे, ठेकेदारांचे कर्तव्य आहे. त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी लोकांवरच खड्डय़ांचे खापर फोडणे चुकीचे आहे. कमानी, जलवाहिनीसाठी खोदकामामुळे रस्ता खड्डय़ात जातो, हा दावा तर हास्यास्पद आहे. शिवाय तो करदात्यांचा अपमानही आहे. दर तीन वर्षांनी रस्त्यांना सील कोटिंग करण्याचे बंधन प्रशासनाने पाळलेच पाहिजे. उन्हाळ्यातच दर्जेदार पॅचवर्क केले तर लोकांना खड्डय़ांतून जावे लागणार नाही. सी. एस. सोनी, निवृत्त शहर अभियंता, मनपा.