आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेशल फोकस: तालुका संकुलांच्या पूर्णत्वास प्राधान्य!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- क्रीडा क्षेत्रात गुणवत्तेच्या दृष्टीने औरंगाबाद जिल्ह्यात खूप संधी आहेत. येथील गुणवत्तेला योग्य न्याय आणि संधी मिळणे गरजेचे आहे. यासाठी सर्वप्रथम तालुका क्रीडा संकुलांची रखडलेली कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती औरंगाबादच्या नव्या जिल्हा क्रीडाधिकारी ऊर्मिला मोराळे यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

तालुका क्रीडा संकुले तयार झाल्यास ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडू पुढे येण्यास मदत होईल. यासाठी कृती आराखडा तयार करून कमी वेळेत अधिकाधिक कामे करण्यावर माझा जोर आहे. तालुका क्रीडा संकुले तयार झाल्यास खेळाडूंना सरावासाठी संधी, साहित्य उपलब्ध होईल. ग्रामीण भागातील खेळाडूंना पूर्ण संधी देण्यासाठी माझे प्रयत्न आहेत, असेही त्या म्हणाल्या.

जिल्हा क्रीडा संकुल साकारण्यासाठी प्रयत्न : औरंगाबाद जिल्हा क्रीडा संकुलाचे काम खूप वर्षांपासून रखडले आहे. जिल्हा संकुलाच्या जागेचा प्रश्न सोडवून या कामालाही प्राधान्य देणार आहे.

जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांची मदत घेऊन खेळ आणि खेळाडूंचा कसा अधिकाधिक लाभ होईल, यासाठी प्रयत्न केले जातील. औरंगाबादेत राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धाही येथे आयोजित करण्यासाठी प्रयत्न असतील, असे त्या म्हणाल्या.

क्रीडा मार्गदर्शकांच्या कामांकडे खास लक्ष
कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शकांच्या कामांकडे विशेष लक्ष असेल. खेळाडू घडवण्याची खरी जबाबदारी त्यांचीच आहे. खेळाडू असेल तरच खेळ टिकेल. क्रीडा मार्गदर्शकांनी मैदानावर अधिकाधिक वेळ देऊन खेळाडू शोधमोहीम राबवण्यापासून ते खेळाडूच्या प्रशिक्षणापर्यंतचे काम केले पाहिजे. ही सर्व कामे त्यांच्याकडून अपेक्षितच असतात. त्यांच्या मदतीसाठी सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापकांची बैठक घेऊन खेळाडू शोधमोहीम राबवली जाईल.

मोराळे यांची ओळख
ऊर्मिला मोराळे यांनी औरंगाबादेत दुसर्‍यांदा जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
मोराळे व्हॉलीबॉल आणि कबड्डीच्या राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत.
शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख राहिली.