आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

73 लाख भरा, नंतरच टाळे काढा; न्यायालयाचे बाजार समितीला आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- थकीत मालमत्ता करापोटी मनपाने जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय आणि गाळ्यांना टाळे ठोकले आहे. याप्रकरणी दिवाणी न्यायालयाने बाजार समितीला 10 टक्के रक्कम म्हणजेच 73 लाख रुपये भरणा करण्याचे आदेश दिले. रकमेचा भरणा होताच मनपानेही टाळे काढावेत, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

बाजार समितीकडे मालमत्ता करापोटी 1997, 98 पासून सात कोटी 32 लाख 23 हजार रुपये कर थकीत आहेत. त्यामुळे 30 जानेवारीला जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय आणि 16 गाळ्यांना टाळे ठोकले. या कारवाईला बाजार समितीच्या वतीने दिवाणी न्यायालयात आव्हान देण्यात आले. समितीतर्फे अँड. र्शीकांत अदवंत यांनी युक्तिवाद केला की, समिती 2007 पासून नियमित कर भरत आहे. मात्र, मनपातर्फे अवास्तव आणि अन्यायकारक कर आकारणी केली आहे. याच प्रकरणात 2007 मध्ये दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) यांनी स्थगिती देऊन प्रकरण जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. हा आदेश आजही कायम असल्याने मनपाच्या कारवाईमुळे न्यायालयाचा अवमान झाला असून मनपाला हे टाळे काढण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली होती. याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर बाजार समितीचे अपील मंजूर करून न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिले आहेत.