आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडाफोड - मृताच्या नावाने केली रजिस्ट्री , प्लॉट हडपणारी टोळी जेरबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रजिस्ट्री कार्यालयात मृत व्यक्तीच्या नावे दुसर्‍याच इसमाला उभे करून प्लॉट बळकावणार्‍या चौघांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या या कारवाईने बनावट रजिस्ट्री करून भूखंड हडपणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी ही कारवाई 1 जुलै रोजीच केली; परंतु प्रकरण क्लिष्ट असल्याने सखोल तपासानंतर रविवारी जाहीर करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयाने चार आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वाळूज महानगर सिडकोतील स्वामी सर्मथनगर येथील रहिवासी कैलास भिकाजी बनकर (52) यांचा मृत भाऊ आसाराम भिकाजी बनकर यांच्या मालकीचा गट क्र. 16 मधील प्लॉट क्र. 45 सातारा भागातील प्रकाशनगर गृहनिर्माण सोसायटीत आहे. या प्लॉटची ( 3 हजार चौ. फूट) किंमत आजच्या बाजारभावानुसार सुमारे 45 लाख रुपये आहे. भारत प्रभाकर साळुंके (45, रा. सुधाकरनगर रोड), रमेश माधवराव वाटोरे (38, रा. म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पिटलसमोर), दीपक बजरंग जोहरे (35, रा. गंगोत्री रेसिडेन्सी, देवळाई चौक) या तीन दलालांनी या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून मृत आसाराम बनकर यांच्याऐवजी दशरथ उद्धव कांबळे यास रजिस्ट्री कार्यालयात उभे करत रजिस्ट्री करून घेतली. कांबळेला यासाठी त्याचा चुलतजावई आणि आरोपी दीपक जोहरे याने 90 हजार रुपये दिले होते, तर जोहरे याने स्वत: 18 लाख रुपये ठेवून घेतले होते.
डमी ओळखण्यासाठी पोलिसांची शक्कल - आसाराम भिकाजी बनकर यांचा ‘डमी’ पोलिसांना सापडत नव्हता. पोलिसांनी रजिस्ट्री कार्यालयात काढलेला बनकर यांचा फोटो घेतला आणि ती व्यक्ती कुणी पाहिल्यास त्याची माहिती सातारा पोलिसांना कळवा, असे आवाहन करणारे पत्रक छापले होते. पत्रक पाहून एका व्यक्तीने आसाराम बनकर नसून दशरथ कांबळे असल्याचे सांगितले. कांबळे हा उस्मानपुर्‍यातील भीमनगर येथील रहिवासी असून त्याने शासकीय सेवेत वाहनचालक (सध्या निवृत्त) म्हणून काम केले आहे. शनिवारी कांबळेला अटक केल्यानंतर त्याने गुन्हय़ाची कबुली दिली. चुलतजावई दीपक जोहरेच्या सांगण्यावरून मी बनावट बनकर बनण्यास तयार झालो, असे त्याने जबाबात सांगितले.
यांनी आवळल्या मुसक्या - पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार सातारा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबूराव कंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश दसगीर, महेश टाक, सहायक उपनिरीक्षक सिद्दिकी, हेडकॉन्स्टेबल कल्याण चाबुकस्वार, नारायण गिरी, सतीश हंबर्डे, संजय चोबे, लांडे पाटील, देशराज मोरे, र्शीकांत सपकाळ आणि मनोज विखणकर यांनी भूखंड हडपणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळल्या.
अशी बनवली बनावट कागदपत्रे - भूखंड हडपण्यासाठी या टोळीने कांबळेचे बनावट मतदार ओळखपत्र चौसरनगरातील एका व्हिडिओग्राफरकडून तयार करून घेतले. यासाठी दीपक जोहरेचे वडील दादासाहेब जोहरे याने मदत केली. संबंधित फोटोग्राफर अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. तथापि, पोलिसांनी संगणक आणि काही साहित्य जप्त केले आहे.
अठरा लाखांत प्लॉटचे हस्तांतर - बनावट कागदपत्रांच्या आधारे हा प्लॉट आधी या टोळीतील दलाल भारत साळुंके याच्या नावावर करण्यात आला. यानंतर तो शहानगरमधील अशपाक शेख यांच्या नावे हस्तांतरित करण्यात आला. मोबदल्यात अशपाक यांच्याकडून जोहरे याने 18 लाख रुपये घेतले. त्यातील 90 हजार रुपये कांबळे यांना दिले.
कारवाईबाबत पोलिसांची आठवडाभर गोपनीयता - मृत आसाराम यांचा भाऊ कैलास बनकर यांनी पोलिस आयुक्तांची 30 जून रोजी भेट घेतली आणि मृत भावाच्या जागी दुसराच इसम उभा करून प्लॉट हडपल्याची तक्रार केली. त्यांनी गंभीर दखल घेत सातारा पोलिस ठाण्याला तपास करण्याचे आदेश दिले. नऊ दिवसांत या प्रकरणाचा छडा लावून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आणि बनकर कुटुंबीयांना न्याय मिळाला. मात्र या कारवाईबाबत 8 जुलैपर्यंत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली.