आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद परिसरातील बारा खेड्यांत रेडीरेकनरमध्ये चौपट वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एक जानेवारीपासून रेडीरेकनरचे नवीन दर लागू होतील. शहरालगतच्या पिसादेवी, कुंभेफळ, हिरापूर, गेवराईसह 12 खेड्यांचे दर विद्यमान दराच्या चारपटीने वाढणार आहेत, तर गुलमंडीसह अन्य भागांतील दर किमान 40 ते 50 टक्क्यांनी वाढवण्याचे शासनाने ठरवल्याचे उच्चस्तरीय अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.
दरवर्षी नव्या वर्षात रेडीरेकनरचे नवीन दर जाहीर केले जातात आणि त्याच दिवसांपासून या दराने रजिस्ट्री होते. प्रत्यक्ष बाजारभाव आणि रेडीरेकनर यात मोठी तफावत असून भविष्यात ही तफावत दूर करून शासनाचा महसूल वाढवण्याचा प्रयत्न आहे. बाजारभावाच्या दहा टक्केही रेडीरेकनरचे दर नाहीत. दरवर्षी रेडीरेकनरच्या दरात वाढ होत असली तरी त्याच्या 10 पटीने बाजारमूल्य वाढते. त्यामुळे दरांतील तफावत वाढतच चालली आहे.
रेडीरेकनरचे दर बाजारमूल्यानजीक असावेत यासाठी जिल्हाधिकारी विक्रमकुमार आग्रही आहेत. त्यांनी शहरालगतच्या जमिनींचा भाव जाणून घेतला तेव्हा ही तफावत समोर आली. त्यामुळे त्यांनी रेडीरेकनरच्या दरात जास्त वाढ प्रस्तावित करण्याची सूचना दिली होती. जमीन दोन ते अडीच कोटी रुपये एकराने विकली जाते तेथे अडीच ते 3 लाख रुपयांचा दर कसा काय असू शकतो, असा त्यांचा सवाल होता. यंदा कमी-अधिक प्रमाणात वाढ सुचवण्यात आली असली तरी पुढील वर्षात हे दर आणखी वाढवण्याचे नियोजन आतापासूनच करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
खेड्यात सध्याचे दर एकरी साडेतीन लाख
या बारा गावांत सध्या 2 लाख ते जास्तीत जास्त साडेतीन लाख रुपये प्रतिएकर असे रेडीरेकनरचे दर आहेत. प्रत्यक्षात येथील जमिनीच्या किमती प्रतिएकर 1 ते दीड कोटी रुपये आहेत. त्यामुळे पहिला टप्पा म्हणून येथील रेडीरेकनरचे दर किमान 10 लाखांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. पुढील वर्षी दरवाढ आणखी जास्त केली जाणार असल्याचे आताच नक्की करण्यात आले आहे.
शहरीकरणामुळे 12 गावे प्रभावक्षेत्र
0सुंदरवाडी 0फत्तेपूर 0हिरापूर 0पिसादेवी 0सावंगी 0झाल्टा 0गेवराई 0शेंद्रा 0कुंभेफळ 0वेरूळ 0नांद्राबाद 0बारलाबाई.
सद्य:स्थितीत या भागात ग्रामीण दर आहेत. मात्र, येथे होणारे शहरीकरण लक्षात घेऊन या गावांना प्रभावक्षेत्र असे संबोधण्यात आले आहे.
गुलमंडीचा सध्याचा दर
10 लाख रुपये प्रतिचौरस मीटर बाजारमूल्य
92 हजार रुपये प्रतिचौरस मीटर वाणिज्य वापरासाठी
प्रस्तावित दरवाढ
50 टक्के म्हणजे नवीन रेडीरेकनर 1 लाख 35 ते 40 हजार रुपयांपर्यंत असेल.
रोकड लांबवल्याचा प्रकार गांभीर्याने
मुद्रांक शुल्क व तहसील परिसरातून 69 लाखांची रोकड 4 डिसेंबरला चोरीस गेली. जमिनीच्या व्यवहारासाठी लक्ष्मीकांत धूत ही रक्कम घेऊन आले होते. 26 लाख रुपये पूर्वीच दिल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे 80 लाख रुपयांचा हा व्यवहार होता.रजिस्ट्री होत असलेल्या भूखंडाची रेडीरेकनरनुसार किंमत होती 12 लाख. हा प्रकारही मुद्रांक विभागाने गांभीर्याने घेतल्याचे सांगण्यात आले.