आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखाकोश भवनाचे झाले गॅरेज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयानंतर डीबी स्टारने लेखाकोश भवनातील बजबजपुरीकडे मोर्चा वळवला आहे. 28 वर्षांपूर्वी 1987 मध्ये 10 हजार चौरस मीटर जागेवर ही लेखाकोश भवनाची भव्य इमारत उभी राहिली. त्या वेळी 42 लाख रुपये खर्च आला. मात्र, आता इमारतीची व परिसराची अवस्था बकाल झाली आहे.

सार्वजनिक पार्किंग : पार्किंगसाठी पैसे आकारले जात नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे लोक बिनधास्त लेखाकोश भवनात गाड्या लावतात. त्यामुळे परिसरात सगळीकडे दुचाकी आणि चारचाकींचा ताफाच दिसतो.

भंगार वाहनांचा थांबा : इमारतीतील अधिकृत पार्किंगची व्यवस्था कचर्‍यात अडकली आहे. शेडही खराब झाल्याने दर्शनी भागातच वाहने लावावी लागतात. त्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भंगार वाहनांचा ताफाही याच आवारात ठेवल्याने परिसराला जणू गॅरेजचेच स्वरूप आले आहे.

कचरा आणि घाण : परिसरात सगळीकडे कचरा साठलेला असतो. मागच्या बाजूला उघड्या गटारी असल्याने डासांचा प्रादुर्भाव कायम असतो. पावसाळ्यात तर पाणी साचून दलदल होते.

बंद प्रसाधनगृहासमोर अडगळीचे भांडार : कार्यालयातील प्रसाधनगृहे कुलूपबंद असून त्याबाहेर मोडक्या टेबल-खुच्र्यांचे भांडार दिसते. त्यामुळे या भागात कायम कचरा आणि धूळ साठलेली असते.

तुटक्या खिडक्या आणि खराब भिंती : भवनातील बहुतांश विभागातील दारे-खिडक्या खराब झाल्या आहेत. भिंतीही खराब झाल्या असून रंग उडून या भिंतींचे पोपडे निघत आहेत.

नुतनीकरणाचा धिमा वेग : इमारतीच्या नुतनीकरणाचे काम सुरू झाले आहे मात्र त्याचा वेग खूपच धिमा आहे. त्यामुळे काम कधी होईल आणि लोकांचा त्रास कधी थांबेल हे सांगता येत नाही.
ठेकेदाराचा बोलण्यास नकार - नूतनीकरण व कामासंदर्भात आम्ही ठेकेदार मोडवणे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांची भूमिका समजू शकली नाही.
पतसंस्थेमार्फत चालवले जाणारे उपाहारगृह वार्षिक पाच हजार रुपये ठेव घेऊन दरमहा अडीच हजार रुपयांनी भाड्याने दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सगळे सांडपाणी आमच्या कार्यालयीन परिसरातून जाते. त्याला पुढे कुठलाही आऊटलेट नाही. अंतर्गत स्वच्छता करण्याची जबाबदारी उपाहारगृहचालकाची आहे. कार्यालयीन परिसराची जबाबदारी लेखाकोश भवन कार्यालयाची आहे. विठ्ठल हारदे,अध्यक्ष, जिल्हा लेखाकोशागार कर्मचारी पतसंस्था
थेट सवाल
जे.पी.चव्हाण साहायक संचालक (प्रशासन)
- लेखाकोश भवनाची इमारत बकाल झालीय..
होय. आता नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे.
- कुठल्या भागाचे नूतनीकरण करत आहात?
तीन मजल्यांपर्यंत फरशी, दारे-खिडक्या, विद्युतीकरण आणि रंगरंगोटी केली जाणार आहे.
- यासाठी नेमका किती निधी मिळाला आहे?
1 कोटी 30 लाख 20 हजार रुपये मंजूर झाले आहेत.
- अंतर्गत काम सुरू झाले, पण परिसरातील बकालीचे काय? त्याचे काम कधी करणार?
अंतर्गत काम आटोपल्यावर बाहेरचे कामही लगेच केले जाणार आहे.
- पण हे काम धिम्या गतीने सुरू आहे.
ठेकेदाराला सांगून वेग वाढवला जाईल.