आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Lok Sabha Constituncy News In Marathi, Mahayuti, Khaire

उमेदवार महायुतीचा, पण प्रचारातून भाजपच गायब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना, भाजप, रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष या महायुतीचे म्हणून खासदार चंद्रकांत खैरे उमेदवार असले तरी प्रचार यंत्रणेत भाजप कुठेच नसल्याचे चित्र दिसत आहे. महानगरपालिकेत शिवसेनेसोबत सत्तेची पदे सांभाळणारे भाजपचे पदाधिकारी प्रचारात दिसत नसून जालना आणि बीड या दोन मतदारसंघांकडेच त्यांचा ओढा असल्याचे समोर आले आहे.


यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र येऊन काम करताना दिसत नसल्याने संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते फिरकले नाहीत. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकांत युती म्हणून काम पाहताना शिवसेना पदाधिकार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून भाजपची मंडळी दिसत असे. यंदा मात्र सुरक्षित अंतर ठेवून त्यांचे काम सुरू आहे. त्यातदेखील भाजपचे पदाधिकारी जवळजवळ गायबच आहेत.


जालना, बीडचा बहाणा
औरंगाबाद मनपाचे 9 वॉर्ड जालना लोकसभा मतदारसंघात येत असल्याने या भागातील भाजपचे नगरसेवक रावसाहेब दानवे यांच्या कामात मग्न आहेत. त्यात स्थायी समिती सभापती नारायण कुचे यांचा समावेश आहे. याशिवाय काही पदाधिकारी, नगरसेवक बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचाराचा बहाणा करून औरंगाबादमधील प्रचारापासून दूर आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी खैरे यांच्या प्रचारातून अंग काढून घेतले.


शिवसेनेच्या वतीने भाजपच्या पदाधिकार्‍यांना प्रचारात सहभागी होण्याच्या विनंत्या केल्या. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळीही केवळ हजेरीपुरते येत भाजप पदाधिकार्‍यांनी आपला दुरावा दाखवून दिला. आम्हाला सन्मानाने प्रचार यंत्रणेत सहभागी करून घेतले जात नसल्याने अंग काढल्याचे काही भाजप पदाधिकार्‍यांनी खासगीत कबूल केले.


मोदींसाठी वॉर्ड सांभाळणार
या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, शिवसेनेच्या प्रचार यंत्रणेत सहभागी न होता आम्ही आमच्या वॉर्डात आमच्या पातळीवर प्रचार करीत आहोत. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. पण समन्वयाचा अभाव असल्याने भाजप अंतर राखून आहे.


बीड आटोपले की येतोच
शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांनी भाजपच्या मित्रांना प्रचाराला या, असे आमंत्रण दिले तेव्हा त्यांना काहींनी आम्ही आधी जालना करून नंतर बीडला जाणार आहोत. 17 एप्रिलला बीडचे मतदान आटोपले की आम्ही सगळे हजर होऊ, असे स्पष्टच सांगितले. जालना मतदारसंघात येणार्‍या वॉर्डांसह काही पदाधिकारी रावसाहेब दानवे यांच्या गटाचे असल्याने त्यांनी येथे खासदार खैरे यांच्याकडे पाठ फिरवत तिकडचा प्रचार सुरू केला आहे.


भाजपची सावध भूमिका
0नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. समन्वयाचा हा विषय किरकोळ आहे.
0यासंदर्भात बोलताना भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर म्हणाले की, भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आपापल्या भागात खासदार खैरे यांच्या प्रचाराला लागले आहेत.