आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Lok Sabha Constituncy News In Marathi, MP, Ranjana Kasab, Divya Marathi

निवडणूक आखाड्यात 27 उमेदवार, तर 10 जणांची माघार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी 27 जण रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत 10 जणांनी माघार घेतली. माघार घेणार्‍यांमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक अफसर खान, बहुजन मुक्ती पार्टीच्या रंजना कसाब यांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 45 उमेदवारांनी मैदानात उडी घेतली होती. त्यातील 8 जणांचे अर्ज अवैध ठरल्याने शेवटी 37 शिल्लक राहिले होते. अर्ज मागे घेण्यासाठी 11 ते दुपारी 3 अशी वेळ होती. या चार तासांत 10 जणांनी अर्ज मागे घेतले आणि 27 जण लढणार हे स्पष्ट झाले. उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे या वेळी दोन मतदान यंत्रे लागणार आहेत. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी विक्रमकुमार, उपजिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, शशिकांत हदगल यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे उद्यापासून प्रचाराचा जोर वाढणार आहे.
आता 3426 बीयू अन् 1713 सीयूची गरज
उमेदवारांची संख्या 15 च्या वर गेल्याने प्रत्येक मतदान केंद्रात दोन बी. यू. (बॅलेट युनिट) लागणार आहे. सी. यू. (कंट्रोल युनिट) एका केंद्राला एक याप्रमाणेच लागते. या मतदारसंघात 1713 मतदान केंद्रे असणार असल्याने 3426 बी. यू. लागणार हे स्पष्ट झाले आहे. उमेदवारांची संख्या 30 च्या पुढे असती तर 1713 बी. यू. वाढवावे लागले असते. जिल्हा प्रशासनाकडे आजघडीला फक्त 72 मतदान यंत्रे असून उर्वरित सर्व यंत्रे येत्या काही दिवसांत बाहेरून येणार आहेत. काही यंत्रे राखीव ठेवावी लागतात. त्यामुळे साडेतीन हजारांवर बी. यू. लवकरच दाखल होतील. त्यांची प्रत्येकी तीन वेळा तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच ही यंत्रे केंद्रांवर दाखल होतील.
हे आहेत रिंगणात
चंद्रकांत खैरे (शिवसेना), नितीन पाटील (काँग्रेस), सुभाष लोमटे (आम आदमी पार्टी), अँड. सदाशिव गायके (समाजवादी पक्ष), पुष्पा जाधव (आंबेडकर नॅशनल काँग्रेस), भानुदास सरोदे (भारतीय क्रांती सेना), फेरोज खान मुर्तूजा खान (वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया), सय्यद शफियोद्दीन वहियोद्दीन, इंद्रकुमार ज्ञानोबा जेवरीकर (बहुजन समाज पार्टी), अहमद युनूस सय्यद (बहुजन मुक्ती पार्टी), शेख नदीम शेख करीम (राष्ट्रीय उलेमा कौन्सिल), राजू बाबूराव काळे (असोसिएशन ऑफ ऑल इंडियन्स), शेख सईद शेख मोहंमद (ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट), अहमद अजीज अहमद (लोकशाही विचार मंच), पन्नालाल प्रेमचंद बन्सवाल (प्रबुद्ध रिपब्लिक पार्टी), मोहंमद कासीम किस्मतवाला, सुरेश आसाराम फुलारे, विशाल उद्धवराव नांदरकर, अंकुश मुंजाजी तुपसमुद्रे, जवाहरलाल लक्ष्मण भगुरे, बाळासाहेब आसाराम सराटे, मधुकर पद्माकर त्रिभुवन, कैलास चंद्रभान ठेंगडे, बाळासाहेब विठ्ठल आवारे, नानासाहेब दामोदर दांडगे, उद्धव गोवर्धन बनसोडे आणि जगदीप विश्वनाथ शिंदे.
यांनी घेतली माघार
डॉ. शंकर सुरासे, शेख रफिक शेख रज्जाक, रंजना ज्ञानोबा कसाब, गौतम भागाजी खरात, केशव विश्वनाथ गायकवाड, प्रकाश विष्णू गायकवाड, अफसर खान यासीन खान, श्रीपाद भगवान कुलकर्णी, पठाण अमजद खलीद, शेख हारुण मलिक.