आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"लोकविकास'च्या आजी-माजी अध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकविकास नागरी सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष तथा माजी आमदार नामदेव पवार यांनी आपल्या मेहुण्याला कर्ज देऊन त्याची परतफेड बँकेच्या नफ्यातून केली. याविरोधात माजी संचालक किसन भादे यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात १३ सप्टेंबरला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. यात पवार, उद्योजक तथा बँकेचे विद्यमान अध्यक्ष अर्जुन गायके यांचाही समावेश आहे.
न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा नोंदवण्यात आला. कन्नड तालुक्यातील शंकर तुकाराम काळे हे पवार यांचे मेहुणे होते. त्यांना सुमारे १८ लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र, कर्जाची परतफेड कर्जदाराच्या मिळकतीमधून करण्याऐवजी पवार यांनी बँकेच्या नफ्यातून केली होती. बँकेचे माजी संचालक किसन भादे यांनी याविरोधात आरबीआय आणि सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. तथापि, यापूर्वीच जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावाही केला. मात्र, पोलिस प्रशासनाने गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानंतर भादे यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासंबंधी अर्ज केला. त्यानुसार ११ सप्टेंबर रोजी न्यायालयाने जिन्सी पोलिसांना फसवणूक केल्याप्रकरणाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते.
शनिवारी पवार, गायके यांच्यासह सुनीता फुके, दिनेश नंदनवार, मदन पोतदार, सुनील ठाकरे, शंकर तुकाराम काळे, भगवान आश्रुबा डोळे यांच्याविरोधात कलम ४२०, ४२४, ४२५, ४६३, ४६४, ४६८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पुढील तपास करण्यासाठी सहकार निबंधकांच्या निर्देशानेच तपास करणे, पुरावे गोळा करणे, आरोपींना ताब्यात घेण्याचे काम करावे लागते, असे स्पष्टीकरण जिन्सी ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी िदले आहे. तर गायके, पवार यांनी फिर्यादीवरच भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. मात्र, त्यांचे आरोप निराधार असल्याचे भादे यांनी म्हटले आहे.
बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी केला फिर्यादीवर पलटवार
फिर्यादीच आरोपी
यापूर्वी जिन्सी ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, गुन्हा दाखल करण्यासारखे पुरावे आढळले नसल्यामुळे त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. वकिलांचा सल्ला घेऊन पुढील न्यायालयात दाद मागण्यात येईल. भादे हे भ्रष्ट आहेत. या षड््यंत्रामागे दुसराच कोणी आहे. अर्जुन गायके, अध्यक्ष, लोकविकास बँक

५० कोटींचे डिपॉझिट वाढले
बँकेचे अध्यक्ष असताना भादे यांनी कोट्यवधींचा गैरव्यवहार केला. यासंदर्भात पुण्याच्या सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांनी अर्जाला मान्यता दिली. त्यानंतर २०१२ मध्येच सर्वानुमते त्यांना बँकेतून काढले. त्यांना काढल्यानंतर बँकेत ५० कोटींचे डिपॉझिट वाढले. नामदेव पवार, संचालक, लोकविकास बँक