आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होय, मेहुण्याच्या नावावर कर्ज घेतले अन् बँकेच्या नफ्यातून फेडले.!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


औरंगाबाद- होय, मी माझ्या बायकोच्या भावाच्या नावावर कर्ज घेतले असून लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या नफ्यातून एनपीएचे (अनुत्पादक कर्ज खाते) कर्ज फेडले. ‘समुद्रात राहणारे मासे, पाणी पिणारच!’ असे म्हणत बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार नामदेव पवार यांनी भ्रष्टाचाराची कबुली दिली.

सिडकोतील संत तुकाराम महाराज नाट्यगृहात रविवारी बँकेची 17 वी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यात संचालक व अध्यक्ष मनमानी कारभार करत असून बँकेचा व्यवहार पारदर्शकपणे होत नसल्याचा आरोप बँकेचे सभासद ललित माळी यांनी केला. त्यानंतर पवार यांनी भ्रष्टाचाराचे सर्मथन करत बँकेच्या नफ्यातून मेहुण्याचे एनपीएचे कर्ज फेडल्याचे सांगितले. सभासदांच्या आरोपांची दखल न घेता ‘कर्ज घेणे हा माझा अध्यक्ष म्हणून हक्क आहे,’ अशा शब्दांत पवार यांनी गंभीर आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला.

व्यवसायासाठी पैशाचा वापर
सर्वसाधारण सभेत सभासदांनी केलेल्या आरोपाप्रमाणे बँकेचे अध्यक्ष पवार यांनी मेहुणा शंकर तुकाराम काळे यांच्या नावावर 18 लाखांचे कर्ज घेतले. या पैशांचा वापर त्यांनी वैयक्तिक व्यवसायासाठी केला. कर्जाची परतफेड करण्यास त्यांनी गांभीर्य दाखवले नाही. शिवाय हे कर्ज एनपीए प्रवर्गात मोडत असल्याचे दाखवले व अन्य बुडीत कर्जदारांप्रमाणे कर्जावर पाच लाख 67 हजारांची सूट मिळवली. इतकेच नव्हे तर एनपीए कर्जाची रक्कम त्यांनी बँकेच्या नफ्यातून भरल्याचा आरोपही करण्यात आला.

नोकर भरतीची चौकशी व्हावी
बँकेच्या नवीन शाखेत पात्र उमेदवारांना डावलून अध्यक्षांच्या नातेवाइकांची वर्णी लागली. नोकरीसाठी प्रत्येकी पाच ते सात लाख रुपये घेण्यात आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सहकार आयुक्तांनी भरती बेकायदेशीर ठरवून ती रद्द करावी, असे लेखी पत्र बँकेला दिले. मात्र, त्यावर काहीही कारवाई झाली नसून प्रकरणाची चौकशी करावी, या मागणीवरूनही सभेत जोरदार चर्चा झाली. अध्यक्ष, सचालकांनी खुलासा केला नाही. सभेत 300 सभासद उपस्थित होते. बँकेच्या एकूण आठ शाखा असून 7,439 सभासद आहेत.

विधान धक्कादायक
पाण्यातील मासे पाणी पिणारच’ हे विधान धक्कादायक होते. आता हद्द झाली असून पवार यांच्याबद्दल बँक सदस्यांनी निर्णय घेणे गरजेचे आहे, तरच बँक वाचेल.
-सुनील ठाकरे, संचालक (माजी उपाध्यक्ष)

त्यांना पदावरून हटवू
भ्रष्टाचाराचे सर्मथन चुकीचे आहे. पवार यांना 15 ऑक्टोबरच्या आत अध्यक्षपदावरून हटवू. त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत 6 सप्टेंबरलाच संपली.
-जे. के. जाधव, संस्थापक अध्यक्ष, लोकविकास.