आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्सिडीझप्रेमी औरंगाबाद सायकलवर फिदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एकाच वेळी 150 मर्सिडीझची खरेदी करून जगभर नावलौकिक मिळवणार्‍या औरंगाबादेत जगप्रसिद्ध ब्रँडच्या 25 लाखांपर्यंतच्या सायकलही दाखल झाल्या आहेत. एवढेच नव्हे, पाऊण लाख रुपये किमतीच्या सायकलीसह 18 ते 40 हजारांपर्यंतच्या तीन डझन सायकलचींही विक्री झाली आहे. सायकलच्या शौकिनांमध्ये आता औरंगाबादही मागे राहिलेले नाही.

युरोप, अमेरिका तसेच ‘टूर-दी-फ्रान्स’ या जगप्रसिद्ध सायकलच्या स्पर्धेत हमखास वापरले जाणारे ‘ट्रेक’, ‘फायरफॉक्स’ हे अमेरिका व ब्रिटनचे नावाजलेले ब्रँड औरंगाबादेतील यांत्रिकी अभियंता अभिजित बंगाळे यांनी प्रथमच आणले आहेत. त्यांनी 13 वर्षे पुण्यातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी केली आणि ‘सेल्स अँड मार्केटिंग’मधील अनुभवाच्या जोरावर या व्यवसायात उडी घेण्याचे धाडस केले आहे. या शहरात मर्सिडीझचे शौकीन असू शकतात, त्या शहरात सायकलचेही शौकीन असणारच, असा अंदाज त्यांनी बांधला. जर तसे शौकीन नसतील तर हवा-ध्वनी प्रदूषणविरहित सायकलचे शौकीन शहरात घडवू, या जिद्दीने ते या व्यवसायात उतरले. गेल्या दिवाळीत त्यांनी दर्गा रोडवर ‘आरोग्यम सायकल्स’ शोरूम सुरू केले. आज वैशिष्ट्यपूर्ण सायकली उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे, तर ‘ट्रेक’ कंपनीची 25 लाखांपर्यंतची सायकलही ते उपलब्ध करून देऊ शकतात. त्यांच्याकडील सर्वांत महाग 75 हजारांची सायकल परभणीच्या डॉ. गणेश चव्हाण यांनी खरेदी केली आहे. नांदेडच्या डॉ. उमेश भालेराव यांनी 40 हजारांची, तर औरंगाबादच्या डॉ. दिलीप मुळे यांनी 34 हजारांची सायकल घेतली आहे.

शोरूममध्येच जुळवणी: दोन्ही कंपन्यांच्या सायकलचे छोटे-मोठे सर्व भाग भल्यामोठय़ा बॉक्समध्ये येतात. या सर्व भागांच्या जुळवणीचे काम शोरूममध्येच करावे लागते.

ताशी 60 किलोमीटर वेग : या सर्व सायकली डोंगराळ, खडकाळ, खराब-वाईट-चांगल्या रस्त्यांवर कमीत कमी त्रास व र्शमांत वेगाने धावू शकतात. चांगल्या रस्त्यावर तर त्या ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगानेही धावू शकतात. औरंगाबादचे रस्ते फारसे चांगले नसले तरी सायकलिंगच्या आनंदाबरोबरच व्यायामाच्या दृष्टीने नक्कीच उपयुक्त आहेत, असेही अभिजित म्हणतात.

तीन कोटींपर्यंत किंमत : जगातील सर्वांत महाग सायकल ही तीन कोटींची असून ‘ट्रेक’ कंपनीनेच तिची निर्मिती केली आहे. पूर्णपणे कार्बन फ्रेम असलेली आणि अगणित वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली ही सायकल जगविख्यात सायकलपटू आर्मस्ट्राँगच्या विजयाप्रीत्यर्थ कंपनीने तयार केली आहे. ‘बटरफ्लाय ट्रेक मॅडोन’ असे त्या सायकलला नाव देण्यात आले आहे, असेही बंगाळे यांनी सांगितले.