आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Market Committee Not Earned Income From Spices

मसाले पदार्थांपासून रुपयाचाही महसूल मिळवला नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत येणा-या प्रत्येक शेतमालावर प्रतिक्विंटल एक रुपयाप्रमाणे मार्केट फी वसूल करते; पण गेल्या 15 वर्षांपासून मसाल्याचे पदार्थ आणि नारळावर बाजार समितीने एक रुपयाही फी वसूल केली नाही. त्यामुळे बाजार समितीचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

जाधववाडी आणि जुना मोंढा येथे दररोज गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कोकण, राजस्थान, विहामांडवा (ता. पैठण) आदी ठिकाणांवरून चार ते पाच ट्रक नारळ, दोन ते तीन ट्रक मसाला, तीन ते चार ट्रक शेंगादाणे आदी माल विक्रीसाठी येतो. या वस्तूंपासून बाजार समितीला दररोज 50 ते 60 हजार रुपये उत्पन्न मिळू शकते; परंतु समिती प्रशासन आणि व्यापा-यांतील हितसंबंध व वरकमाईमुळे पंधरा वर्षांत एक रुपयाचेही शुल्क वसूल करण्यात आलेले नाही. 15 वर्षांचा हिशेब केल्यास ही रक्कम कोट्यवधींच्या घरात जाते, तर दुसरीकडे शेतक-यांच्या दहा किलो मालावर सक्तीने मार्केट फी वसूल केली जाते. तसेच त्यांना रस्ते, वीज, पाणी, निवास आदी सोयी-सुविधाही दिल्या जात नाहीत. या भ्रष्ट कारभारावर वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते. समितीच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शेतमालाची अधिसूची : सर्व अन्नधान्य, फळे, भाजीपाला आणि मसाल्याच्या सर्व पदार्थांवर नियमाप्रमाणे मार्केट फी वसूल करण्याचे निर्देश आहेत. मात्र, प्रत्यक्षात मसाला, नारळ यावर एक रुपयाही फी आकारली गेली नाही. शेंगादाण्यांवर नावालाच फी वसूल केली जात आहे.

वार्षिक अहवालात नोंद नाही : समितीने वर्षभरात आलेल्या सर्व मालाची आवक-जावक, त्यापासून मिळणारे उत्पन्न, त्याला मिळालेला कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव याची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. त्या प्रमाणे काही अन्नधान्य, फळभाज्यांची नोंद ठेवली आहे. पण नारळ, शेंगादाणे आणि मसाल्याच्या पदार्थांची आवक-जावक आणि उत्पन्नाची नोंद नाही.

काजू, बदाम, राई, जिरे अशा चौदा प्रकारच्या वस्तंूवर मार्केट फी आकारली जात नाही. नवीन प्रशासक मिलिंद भालेराव यांनी बाजार समितीचा कारभार हाती घेतल्यापासून नारळ शेतमालापासून चांगले उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे.

जुना मोंढ्यात शेतमाल विक्रीस बंदी : बाजार समितीत अनागोंदी कारभार सुरू असल्याचे वार्षिक सभेत उघड झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही आर्थिक हितसंबध असल्यामुळे जुन्या मोंढ्यातील मालाची विक्री बंद झालेली नव्हती. याबाबत ‘दिव्य मराठी’ने 28 सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल समिती प्रशासनाने उशिरा का होईना घेतली असून जुन्या बाजारात शेतमाल विक्रीस 28 सप्टेंबर रोजी निर्बंध घालण्यात आला आहे. यामुळे जाधववाडी येथील नवीन बाजारपेठेचे उत्पन्न वाढणार आहे. स्पर्धा वाढून शेतक-यांना फायदाही होणार आहे.