आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपदावरुन सेना - भाजपात चुरस, अपक्षांची खेचाखेची सुरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यंदाचे महापौरपद सर्वसाधारण असल्याने त्याच वॉर्डातून आलेल्या व्यक्तीस महापौर करण्याचे संकेत शिवसेनेतून मिळत असून त्यामुळे सेनेतील शर्यतीत बदल होत आहे. दरम्यान, औरंगाबाद महापालिकेत 'मोठो भाऊ' कोण यावरुनही युतीत वाद होण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेना मोठा पक्ष आहे. मात्र भाजप अपक्षांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असून लवकरच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पाच अपक्षांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यानंतर भाजपचे संख्याबळ 22 वरुन 27 वर पोहोचेल. वाढलेल्या संख्याबळामुळे भाजप महापौर पदावर दावा करण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत महापौरपदाचे दावेदार असलेले विकास जैन व नंदकुमार घोडेले यांना या संकेतांमुळे संधी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. दुसरीकडे, राजू वैद्य, त्र्यंबक तुपे या अनुभवी नगरसेवकांची नावे यासाठी पुढे आली असून अपक्षांच्या खेचाखेचीतील आणखी कुणाला संधी दिली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
५१ सदस्य संख्या घेऊन व बंडखोर, अपक्षांना सोबतीला घेण्याचे प्रयत्न शिवसेना व भाजपने सुरू केले आहेत. सध्या दोन्ही पक्ष मोठा भाऊ होण्याचे जोरदार प्रयत्न करत आहेत. भाजपने तर मनपात ५० टक्के सत्ता सहभाग मागत महापौर आमचाच होईल, असे जाहीरही करून टाकले. दुसरीकडे शिवसेना आपले थोरलेपण टिकवण्याच्या ईर्ष्येला पेटली असून त्यांनीही बंडखोर व अपक्षांना चुचकारणे सुरू केले आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर महापौर कोणाचा व कोण या दोन प्रश्नांची उत्सुकता वाढली आहे. आज सायंकाळी शिवसेनेच्या सगळ्या नव्या नगरसेवकांची बैठक प्रचार कार्यालयात पार पडली. त्यात महापौरपद सर्वसाधारण असेल, तर त्याच वॉर्डांतून निवडून आलेल्यास संधी देण्यात यावी, असा सूर निघाला. शिवसेनेच्या नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत. असा ठाम निर्णय पक्षाने घेतला तर सेनेचे दोन तगडे दावेदार शर्यतीबाहेर पडतील. त्यात ओबीसी वॉर्डातून निवडून आलेले विकास जैन व नंदकुमार घोडेले यांचा समावेश आहे. या दोघांनीही तिकीट मिळाल्यापासूनच महापौरपदासाठी फील्डिंग लावली होती.
नवे दावेदार

आता सर्वसाधारण वॉर्डांतून निवडून आलेल्यांत राजू वैद्य व त्र्यंबक तुपे यांची नावे अग्रभागी आली आहेत. दोघांचेही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत व त्यांना मनपाच्या कारभाराचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

बारवालांनाही संधी?

दरम्यान, आकड्यांची जुळवाजुळव करताना निवडून आलेल्या अपक्ष व बंडखोरांना आपल्या गोटात खेचण्यासाठी काही ना काही द्यावे लागणार याची जाणीव सेनेच्या नेतृत्वाला आहे. माजी महापौर गजानन बारवाल पदमपुरा या सर्वसाधारण वॉर्डातून निवडून आले आहेत. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; पण जर त्यासाठी महापौरपद बारवाल यांनी मागितले, तर आकड्यांचे गणित जुळवताना सेनेच्या नेत्यांना त्यांचा प्राधान्याने विचार करावा लागेल, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.
पराभव जिव्हारी लागल्याने हाणामारी

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर गुरुवारी एकीकडे विजयी उमेदवारांचा विजयोत्सव सुरू असताना दुसरीकडे पराभूत उमेदवारांनी विविध ठिकाणी राडा केला. शिवाजीनगर, गुलमंडी, एमआयडीसी सिडको आणि जिन्सी भागात मारहाणीच्या घटना घडल्या. काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
शहरातील संवेदनशील भागांना अक्षरश: छावणीचे रूप आले होते. अनेक कार्यकर्ते या घटनांमध्ये जखमी झाले. तलवारी, लाठ्या-काठ्यांसह दगडफेकीच्या घटनादेखील घडल्या. विविध पक्षांच्या दहापेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवाजीनगरात मतदारांच्या घरी फोडल्या कपबशा

शिवाजीनगर येथे पराभूत उमेदवार विनोद सोनवणे आणि त्यांच्या समर्थकांनी मतदारांच्या घरी जाऊन कपबशा फोडल्या. तसेच तलवारीचा धाक दाखवत शिवीगाळ केली. पोलिसांनी विनोद सोनवणे, त्याचा भाऊ प्रवीण सोनवणे, शंतनू उऱ्हेकर, हर्षल पाटील, स्वप्निल ताकवाले, बापूसाहेब लगड यांना अटक केली असून इतर चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या वॉर्डातून शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ हे विजयी झाले आहेत. मात्र, पराभवामुळे सोनवणे यांनी मतदारांना तलवारीचा धाक दाखवत धिंगाणा घातला. जवाहरनगर ठाण्यासमोर जंजाळ आणि सोनवणे समर्थक धिंगाणा करीत होते. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला.
किराडपुऱ्यात हाणामारी

महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जय-पराजयातून गुलमंडी, शिवाजीनगर, जिन्सीत हाणामारी व सशस्त्र हल्ल्याच्या घटना घडल्या. िकराडपुऱ्यात एमआयएमचे इर्शाद खान व काँग्रेसचे पराभूत उमदेवार रमजानी खान या दोन्ही चुलत भावंडांत निकालानंतर हाणामारी झाली. इर्शाद यांनी रमजानी यांचा पराभव केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांवर चालून गेले. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. रात्री उशिरापर्यंत जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरात घडलेल्या अनुचित प्रकारांच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्तात कमालीची वाढ करण्यात आली.
व्यासांच्या कार्यालयात राडा

गुलमंडी येथील अपक्ष उमेदवार पप्पू व्यास यांच्या घरात आणि कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. शिवसेनेचे उमेदवार सचिन खैरे यांच्या पराभवाला पप्पू व्यास कारणीभूत असल्याचा आरोप करीत खासदार खैरे यांची पत्नी वैजयंती खैरे, सचिन खैरे यांची पत्नी आणि आई व महिला कार्यकर्ते व्यासच्या घरी गेले. तुमच्यामुळे आम्ही पडलो म्हणून तुमचा सत्कार करण्यासाठी आलो आहोत, असे उपरोधिकपणे बोलल्यामुळे वातावरण चिघळून दगडफेक झाली. काही कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली. क्रांती चौक आणि सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी येऊन सौम्य लाठीमार केल्याने जमाव पांगला.
भगवा फडकल्याचा खैरे, कदम यांना आनंद
खासदार चंद्रकांत खैरे यांनी शहरात युतीच्या ६५ जागा येऊ शकत असताना बंडखोरांमुळे त्या कमी झाल्याचे सांगत शहरावर युतीचा भगवा पुन्हा फडकल्याचे समाधान व्यक्त केले. मात्र, गुलमंडीच्या पराभवाने आपल्याला अतीव दु:ख झाल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय महापौर कला ओझा यांनाही बंडखोरांमुळेच पराभव पत्करावा लागल्याचे त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री रामदास कदम म्हणाले, शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसला हे मान्यच करावे लागेल. तरीपण सलग सहाव्यांदा या शहराची सत्ता शिवसेना व भाजप युतीकडे आली हा शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा विजय आहे.
आम्ही शहराच्या विकासाचेच विषय प्रामुख्याने मांडत राहिलो. पाणी, रस्ते या विषयांवर काय करणार आहोत हेही सांगितले. शहराचा विकास हेच आमचे लक्ष्य असून दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत.
प्रदीप जैस्वाल म्हणाले, जनतेने पुन्हा एकदा युतीला कौल दिला. शहराच्या विकासासाठी युतीचे सर्व शिलेदार झटून काम करतील याची ग्वाही मी देतो. या वेळी आम्हाला १० ते १२ ठिकाणी बंडखोरांचा फटका बसला हे मान्यच करावे लागणार आहे. बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी आपण स्वत: खूप प्रयत्न केले. सुमारे १९८ बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. एमआयएमच्या उदयामुळे शहरात शिवसेना महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेना व भाजप युती मनपाच्या सभागृहात व बाहेरही एमआयएमच्या विरोधात ठामपणे उभी राहणार आहे.