औरंगाबाद - महापौर झाल्यानंतर प्रथमच त्र्यंबक तुपे यांनी सोमवारी दिव्य मराठी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी संपादकीय सहकार्यांशी चर्चा करताना त्यांनी आगामी काळात करावयाच्या कामांची माहिती दिली नागरिकांना सेवा-सुविधा देण्यासाठी
आपला कार्यक्रमही त्यांनी सांगितला. त्यांचे हे मनोगत त्यांच्याच शब्दांत....
महापौर म्हणून आता काम सुरू केले आहे. परवाच अधिकार्यांची बैठक घेतली. त्यात काय काय करायचे यावर चर्चा केली. त्याचा आराखडा ठरवला. पाणी, रस्ते, साफसफाई, नाले स्वच्छता यांना आधी हात घालणार आहे. त्यातही रस्ते आणि पाणी हे महत्त्वाचे विषय आहेत. रस्त्यांची कामे सुरू आहेत, पण बर्याच ठिकाणी चौकांत जॉइंट्सची कामे बाकी आहेत, पॅचवर्कचा विषय आहे. एरवी पावसाळ्यात पॅचवर्कची कामे सुरू होतात. यंदा पहिल्यांदाच आता ही कामे हाती घेणार आहोत. आठवडाभरात पॅचवर्कच्या कामांना धडाक्यात सुरुवात होईल. ते जाॅइंट्सही बुजवले जातील.
समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाले आहे. या महिनाअखेरीला मोठे पाइप टाकण्याचे काम सुरू होईल. तसेच शहरातही पाइपलाइन बदलण्याची कामे सुरू होतील. मागच्या अनेक महिन्यांपासून हायड्रोलिक प्लॅनची चर्चा ऐकत होतो. आता पुरे झाले, काम सुरू करा असे कंपनीला सांगितले आहे. ते काम मार्गी लागेल.
पावसाळ्याआधी नाल्यांची सफाई केली जाणार आहे. लगेच हे काम हाती घेतले जाणार आहे. याशिवाय एक सर्वेक्षण करून शहरात किती नाले आहेत याची माहिती घेतली जाणार आहे. नंतर या नाल्यांचे चॅनलिंग करण्यात येणार आहे. भूमिगत गटार योजनेत त्याचा समावेश नाही. यासाठी मोठा निधी लागणार आहे. केंद्र सरकार अथवा राज्य सरकारकडून त्यासाठी निधी आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
शहरातील वाहतूक बेटे सुशोभित करण्याचा प्रकल्प हाती घेणार आहोत. त्यासाठी खासगी कंपन्या, व्यापारी यांची मदत घेतली जाणार आहे. १९९५ साली तत्कालीन आयुक्त कृष्णा भोगे यांनी तयार केलेल्या वाहतूक बेटांची नंतर देखभाल झालेलीच नाही. आता लोकसहभागातून शहरातील प्रमुख चौकांतील बेटे खासगी कंपन्यांनी व्यापार्यांनी दत्तक घेत सजवावीत त्याची देखभालही करावी असा हेतू आहे. अनेकांनी त्याची तयारीही दर्शवली आहे. याशिवाय शहरात वृक्षारोपणाचे काम हाती घेतले जाणार आहे. अगदी बाजारपेठेतही झाडे लावून आसपासच्या व्यापारी प्रतिष्ठानांनी ते दत्तक घेऊन त्यांची देखभाल करावी अशी अपेक्षा आहे. शहर बससेवा ही शहराची तातडीची गरज आहे. ती सुरू व्हावी याचे प्रयत्न सुरू आहेत. मग ही सेवा मनपाची असेल किंवा खासगी, पण नागरिकांना सुविधा देणे गरजेचे आहे. पालकमंत्री रामदास कदम यांच्यासोबत चर्चाही झाली. त्यांनी अधिकार्यांना बोलावून त्यांनाही सूचना केल्या आहेत.
मनपा शाळांची देखभाल-दुरुस्ती, सुविधा देणे यांनाही प्राधान्य देणार आहोत. क्रीडा शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार आहोत. मी स्वत: खेळाडू असल्याने मला ती आवड आहे. मनपा शाळांची अंतर्गत क्रीडा स्पर्धा सुरू करण्याचा माझा विचार आहे. गुंठेवारी वसाहतींचे प्रश्न सुटावेत, त्या नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून सरकारकडे १०० कोटी रुपयांचा निधी मागणार आहोत. शिवाय गुंठेवारीची मुदत वाढवण्याचा निर्णयही सरकार घेत आहे. त्याचा निश्चित फायदा होईल.