आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे बजेट असू शकते ६०० कोटींचे, आज सादर होणार अर्थसंकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आजघडीला पगाराचेही वांधे झालेल्या मनपाचा पुढील आठ महिन्यांसाठीचा सुमारे ६०० कोटी रुपये उत्पन्न गृहीत धरणारा अर्थसंकल्प उद्या (दि. आॅगस्ट) स्थायी समितीसमोर सादर होत आहे. आता नवीन महापालिका अस्तित्वात आल्याने प्रशासनाच्या या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांच्या स्पील ओव्हरला तिलांजली मिळणार, हे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी आठ महिन्यांत ६०० कोटींचे उत्पन्न करण्याचे अशक्यप्राय आव्हान मनपासमोर राहील. शिवाय आगामी काळात सर्वसाधारण सभाही सर्व नगरसेवकांना खुश करण्यासाठी या अर्थसंकल्पात किमान दीडशे कोटींची भर टाकेल, असे आताचे चित्र आहे.
मनपाची तिजोरी सांभाळताना नाकीनऊ आलेल्या मनपा प्रशासनाला या आर्थिक वर्षाच्या उरलेल्या महिन्यांचे बजेट तयार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. मनपात येणारी आवक पाहता त्यानुसार तरतूद करायची असेल, तर नगरसेवक पदाधिकाऱ्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताकदवान पदाधिकारी नगरसेवकांनी आपापली कामे पद्धतशीरपणे अर्थसंकल्पात घुसवली असून आता बाकीच्या- खासकरून नवीन नगरसेवकांची अडचण होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्याच्या या बजेटमध्ये प्रशासन संभाव्य उत्पन्नाचा आकडा ६०० कोटींच्या आसपास जाईल, असे गृहीत धरण्यात येत आहे. सद्य:स्थितीत हे अवास्तवच दिसते. महापालिका राज्य सरकारकडून येणाऱ्या निधीवर डोळा ठेवून बजेटमध्ये तरतूद करणार असल्याचे समजते. याशिवाय एलबीटीच्या बदल्यात आपल्याच सरकारकडून जास्तीत जास्त अनुदान पदरी पाडून घेण्याची इच्छा दिसून येते.
स्थायीचे सभापती दिलीप थोरात म्हणाले की, प्रशासन अर्थसंकल्पात नियमित खर्चालाच प्राधान्य देत असते. त्यामुळे आम्ही नागरिकांच्या हिताची विकासाची कामे त्यात घेऊ. कर वसुलीला भरपूर वाव असल्याने हे अवास्तव आहे, असे म्हणता येणार नाही.
स्पील ओव्हरला रामराम
तत्कालीनमहापौर अनिता घोडेले यांच्यापासून अर्थसंकल्प फुगवण्याचे काम सुरू झाले. स्पील ओव्हरची कामे त्यात घेण्यात आली होती. आजही २५० कोटींची कामे बाकी आहेत, पण आता नवा भिडू नवा राज आल्याने तिजोरीची नाजूक हालत पाहता अशक्य असल्याने स्पील ओव्हरच्या कामांना रामराम केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
इथेही फुगवाफुगवी
एकीकडेखात्री नसूनही येऊ शकेल अशा सरकारी निधीवर डोळा ठेवून प्रशासनाने बजेट तयार केले असले, तरी त्यात आता स्थायी समितीही काही विकासकामे घुसवणार आहेच. त्यासाठी उत्पन्न आणखी किमान १०० कोटींनी वाढवण्याच्या सूचना करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...