आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डेविरोधी संताप लांब उडीतून व्यक्त, मनसेच्या लांब उडी स्पर्धेत दोन हजार नागरिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनपातील सत्ताधारी शिवसेना-भाजपने आणलेले अडथळे दूर सारत नागरिकांनी लांब उड्या मारत खड्डय़ांवर संताप व्यक्त केला. गेल्या महिनाभरापासून खड्डय़ांमुळे हैराण झालेल्या औरंगाबादकरांची व्यथा युतीच्या पदाधिकार्‍यांपुढे जावी, यासाठी मनसेतर्फे मंगळवारी (30 जुलै) लांब उडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उस्मानपुर्‍यातील दहावी बोर्ड कार्यालयासमोरील चौकात झालेली ही स्पर्धा पाहण्यासाठी दोन हजार नागरिक हजर होते.

यंदा पावसाच्या दोन-चार फटकार्‍यांतच रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. एकही रस्ता खड्डय़ांविना राहिलेला नाही. त्यामुळे सत्ताधारी, विरोधकांची कानउघाडणी आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यासाठी मनसेने आज लांब उडी आंदोलन आयोजित केले. मनसेचे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, गौतम आमराव यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात विभागाध्यक्ष राजगौरव वानखेडे, बिपिन नाईक, आशिष सुरडकर आदींचा सहभाग होता.

स्पर्धेचे ठिकाण बदलावे लागले

मनसेने स्पर्धेसाठी व्हिट्स हॉटेलसमोरील चौक निवडला होता. मात्र, त्याची कुणकुण लागताच तेथील खड्डे सोमवारी सायंकाळीच सत्ताधार्‍यांच्या सांगण्यावरून बुजवण्यात आले. सत्ताधार्‍यांच्या या डावपेचाची पूर्वकल्पना असल्याने आम्ही आधीच उस्मानपुरा चौकातील जागेसाठी पोलिसांकडे अर्ज दिला होता, असे खांबेकर यांनी सांगितले.

जुन्या पदाधिकार्‍यांची पाठ

गेल्या महिन्यात मनसेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर हे पहिलेच आंदोलन झाले. जुने पदाधिकार्‍यांनी त्याकडे पाठ फिरवली होती. मात्र, त्याचा परिणाम जाणवला नाही. नाशिक महानगरपालिकेवर मनसेची सत्ता आहे. तेथे शिवसेनेने खड्डे चुकवा स्पर्धा घेतली. त्याची परतफेड मनसेने केली, अशी चर्चा होती.

विविध बक्षिसांचे वाटप

सहा फुटांच्या खड्डय़ावरून उडी मारून तुषार पाखरे याने पहिला क्रमांक मिळवला. त्याला धनुष्यबाण देण्यात आला. चार फुटांवर उडी मारणार्‍या रत्नमाला पारधे यांना कमळ, तर कुणाल जाधव यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

आंदोलनाचे स्वागत
हा रस्ता म्हणजे युतीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यातील त्रुटी, अडचणींविषयी केलेल्या आंदोलनाचे स्वागतच आहे. विकास जैन, माजी सभापती