आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेल रेल्वेस्टेशनच्या कामासाठी साडेचार कोटी देण्यासही टाळाटाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहराच्या मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दुसर्‍या फेजचे काम निधीअभावी रखडले आहे. मात्र, आता मॉडेल रेल्वेस्थानकाच्या उभारणीला रेल्वे प्रशासनाकडून प्रथम प्राधान्याऐवजी हात आखडता घेतला जात आहे. औरंगाबाद स्थानकामधून रेल्वेला वर्षाकाठी 43 कोटी 20 लाख रुपये महसूल मिळतो. मात्र, या महसुलापैकी साडेचार कोटी रुपये देण्यासही रेल्वे प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. यंदाच्या बजेटद्वारे मिळालेला निधी मॉडेल स्थानक उभारणीऐवजी अत्यावश्यक कामांवर खर्च केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद रेल्वेस्थानकाचा मॉडेल स्थानकात समावेश केल्यानंतर त्यासाठी नऊ कोटी रुपये मंजूर करण्य़्ात आले. पहिल्या टप्प्यात इमारतीचे काम करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यात फूड प्लाझा, मल्टी फंक्शन कॉम्प्लेक्स, लिफ्ट, स्वयंचलित पायर्‍या, प्रवासी विर्शामगृह आदी कामांचा समावेश आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे व्यवस्थापक देविप्रसाद पांडे यांनी एप्रिलमध्ये ट्रॅकची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी मॉडेल स्टेशनचे काम एकाच टप्प्यात केले जाते, अशी माहिती दिली होती, परंतु औरंगाबाद स्थानकासंबंधी सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

वर्षाला मिळतात 43 कोटी

औरंगाबाद स्थानकावरून नियमित तिकीट काढणारांची संख्या सरासरी 13200 इतकी आहे. मागील (एप्रिल 2012 ते मार्च 2013) वर्षात प्रतिदिन सरासरी 12495 प्रवाशांनी स्थानकावरून चालू तिकीट काढल्याची नोंद आहे. आरक्षणाद्वारे दररोज साडेसहा लाख रुपयांचा महसूल मिळतो, तर तिकीट खिडकीवर 5 लाख 34 हजार 54 रुपये आर प्रतिदिन 12 लाख रुपयांचा महसूल औरंगाबाद स्थानकातून प्राप्त होतो. महिन्याला आरक्षण व स्थानकावरून मिळणारा महसूल 3 कोटी 60 लाख रुपये इतका आहे.

अतिमहत्त्वाच्या कामांना प्राधान्य
नांदेड विभागास प्रवासी सुविधांसाठी आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. विभागात नांदेड, परभणी व औरंगाबाद स्थानकांमधून मोठय़ा प्रमाणावर महसूल मिळतो. मॉडेल स्थानकाचे काम सहा महिने झाले नाही तरी चालेल, परंतु इतर अत्यावश्यक सुविधा देण्यास प्राधान्य दिले जाईल. - प्रकाश निनावे, विभागीय उपव्यवस्थापक द.म.रेल्वे नांदेड

आठ कोटी मिळणार
नांदेड विभागास मिळालेल्या आठ कोटींच्या निधीतून फूट ओव्हरब्रिज, परभणी प्लॅटफॉर्म दुरुस्ती, पूर्णा प्लॅटफॉर्मचे काँक्रिटीकरण, औरंगाबाद स्थानकावर लिफ्ट बसवणे, नगरसोल स्थानकावर फूट ओव्हरब्रिज या कामांचा समावेश आहे.

तिकीट खिडकीवर मिळणारा महसूल
प्रतिदिन प्रवासी संख्या 13100
दरमहा प्रवासी संख्या 3 लाख 93 हजार 15
वर्षभरातील प्रवासी संख्या 47 लाख 16 हजार 180
प्रतिदिन उत्पन्न 5 लाख 34 हजार 54 रु.
प्रतिमाह उत्पन्न 1 कोटी 60 लाख 21634 रु.
प्लॅटफॉर्म तिकीट 856 (प्रतिदिन) 25689 (प्रतिमहा)

दोन्ही मिळून महिन्याला महसूल 3 कोटी 60 लाख रुपये.

वर्षाकाठी मिळणारा महसूल 43 कोटी 20 लाख रुपये.

आरक्षण कार्यालयातील महसूल 6.5 लाख रुपये प्रतिदिन.