आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad MP Khaire And Minister Darda Politics

आशा मोरे होणार विरोधी पक्षनेत्या ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काँग्रेसचे नगरसेवक रावसाहेब गायकवाड यांच्या नियुक्तीला अकरा नगरसेवक, शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे व शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी विरोध केला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नियुक्तिपत्र देऊनही गायकवाड यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. आशा मोरे यांना पाठिंबा देऊन त्यांना विरोधी पक्षनतेपदी निवडून आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.

प्रदेशाध्यक्षांनी दिलेले नियुक्तिपत्र गायकवाड यांनी शहर पदाधिकार्‍यांकडे सोपवले होते. मात्र, स्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केल्याने तीन महिन्यांपासून विरोधी पक्षनेतेपदाचा घोळ कायम आहे. पक्ष निरीक्षक सचिन सावंत यांनी डॉ. खान यांना त्वरित राजीनामा देण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच नगरसेवक, पदाधिकारी यांची बैठक घेऊन तातडीने गायकवाड यांच्याबाबत सर्वांची मते जाणून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी दोन दिवसांपूर्वी शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. नवीन विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी सोमवारी (10 जून) दुपारी एक वाजता बैठक झाली. या वेळी प्रमोद राठोड, मीर हिदायत अली, रावसाहेब गायकवाड उपस्थित होत, तर 10 नगरसेवक बैठकीला अनुपस्थित होते. यामुळे बैठकीत काहीच निर्णय होऊ शकला नाही. येत्या तीन दिवसांच्या आत पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीत सर्व नगरसेवक, पदाधिकार्‍यांचे मत घेऊन अहवाल पक्षर्शेष्ठींकडे पाठवण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम यांनी सांगितले.

खासदार खैरेंचा विरोध
रावसाहेब गायकवाड हे खासदार चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांचा पराभव करून नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे गायकवाड यांच्या निवडीला खासदार चंद्रकांत खैरे यांचा विरोध असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दर्डांना मंत्रिमंडळातून वगळा
शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा हे दलित आणि मुस्लिम विरोधात सातत्याने काम करत आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा आदेश ते धुडकावून लावतात. गायकवाड हे ऋषिकेश खैरे याचा पराभव करून नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे त्यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागायलाच हवी, पण खैरे आणि दर्डा यांच्या मिलिभगतमुळे त्यांना विरोध होत आहे. तेव्हा पक्षाच्या विरोधात कारवाया केल्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी.
चंद्रभान पारखे, प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस.