आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात झाले प्रात्यक्षिक, औरंगाबाद मनपाची यंत्रणा खरेदी करण्याची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- खड्डे कायमस्वरूपी, दर्जेदार पद्धतीने बुजवणारे जेटपॅच यंत्र उपलब्ध झाले आहे. या यंत्राचे प्रात्यक्षिक नुकतेच धुळे शहरात झाले आहे. औरंगाबादेतही त्याचे प्रात्यक्षिक करून नंतर ही यंत्रणा खरेदी करण्याची तयारी महापालिकेने दाखवली आहे.
औरंगाबादेतील खड्डेमय रस्ते आता राज्यभरात कुख्यात झाले आहेत. रस्त्यांची कामेही ठप्प आहेत. शहराच्या सर्वच भागांत खड्ड्यांचे साम्राज्य असले, तरी पॅचवर्कचे काम सुरू झालेले नाही. औरंगाबादच्या तुलनेत लहान असणाऱ्या धुळे महापालिकेने पॅचवर्कचे काम चांगले, लवकर व अगदी पावसाळ्यातही करता येईल अशा जेटपॅच या तंत्राचा वापर करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून लवकरच त्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

नियम कुणीच पाळत नाही
"दिव्य मराठी'ने गेल्या दीड वर्षात सातत्याने रस्त्यांचा प्रश्न मांडला. समस्या, गैरप्रकारांवर प्रकाशझोत टाकला. तज्ज्ञांशी चर्चा करून पॅचवर्क कसे असावे यावरही माहिती प्रकाशित केली होती. इंडियन रोड काँग्रेसने पॅचवर्कचे काम कसे असावे याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार आधी खड्डा चौकोनी अथवा आयताकृती करून घ्यावा, तो बाजूच्या रस्त्याच्या जाडीएवढा खोदून मगच त्यात छोटी व मध्यम आकाराची खडी व डांबर टाकावे. त्यानंतर मूळ रस्त्याच्या पृष्ठभागाशी जुळेपर्यंत विशिष्ट प्रकारेच रोलिंग करावे, असे निर्देश आहेत. त्याचे मनपा व मनपाचे ठेकेदार कधीच पालन करताना दिसत नाहीत. परिणामी, एकदा भरलेला खड्डा काही दिवसांतच मूळ आकारात येतो.

नव्या तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक
स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे म्हणाले की, खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. जेटपॅचचे तंत्र महागडे असले, तरी आहे त्या आर्थिक स्थितीतून मार्ग काढून ते करता येईल का यासाठी मी पुढाकार घेणार आहे. किमान त्याचे प्रात्यक्षिक तरी व्हावे, याबाबत शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याशी बोलणार आहे.
जेटपॅचसाठी प्रयत्न करू
येत्या काळात आर्थिक स्थिती सुधारल्यावर तातडीने जेटपॅचसारखे नवीन तंत्र वापरता येईल. तोपर्यंत या यंत्राचे प्रात्यक्षिक औरंगाबादेत करण्याचा प्रयत्न निश्चित करू, असे शहर अभियंता सखाराम पानझडे म्हणाले.