आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Budget, Latest News In Divya Marathi

मनपाच्‍या बजेटमध्ये 113 कोटींची कामे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपा प्रशासनाने सादर केलेल्या 549 कोटींच्या कडेकोट अर्थसंकल्पात अखेर अपेक्षेप्रमाणे स्थायी समितीने 113 कोटींची कामे घुसवली. बहुतांश कामे सदस्यांनी आपापल्या वॉर्डांचे हित पाहून ओढून घेतली असून ज्या स्पिल ओव्हरच्या कामांमुळे मनपावर आर्थिक संकट आले आहे, त्या स्पिल ओव्हरच्या कामांतीलच ही कामे आहेत. आता 5 मार्च रोजी सर्वसाधारण सभेत हा अर्थसंकल्प मांडला जाणार असून त्यात आणखी किमान 150 कोटींची भर पडू शकते.
गेल्या शुक्रवारी मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी मनपाचा 19 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प मांडताना गंभीर आर्थिक संकटाची जाणीव करून देत कोणतीही कामे आता घुसवू नका, असे स्पष्ट सुचवले होते; पण हे वर्ष निवडणुकीचे असल्याने अपेक्षेप्रमाणे आज स्थायी समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पावर चर्चा झाली आणि त्यात कामे घुसवण्यात आली.
समीर राजूरकर यांनी दरवर्षी वापर न होणार्‍या तरतुदींचा पैसा इकडे वळवण्याची सूचना केली. त्यात अपंगांचे पुनर्वसन व उपचार केंद्राचे 50 लाख, हगणदारीमुक्त शहर जनजागरण अभियानाचे 25 लाख, शाळा, रुग्णालयाच्याच दुरुस्तीसाठी प्रत्येक वॉर्डाला दिलेले प्रत्येकी 65 लाख रुपये, वाहतूक संकेत म्हणजे झेब्रा क्रॉसिंग, पट्टे मारणे, सिग्नल या कामांसाठी ठेवलेले 1 कोटी, सलीम अली सरोवरासाठी दिलेले दीड कोटी, प्रवास भत्ता, करवसुली विभागातील इतर प्रशासकीय खर्च, नाला सफाईचा वॉर्डनिहाय खर्च, विशेष पोलिस कक्षासाठी तरतूद या इतर बाबींत कपात करून ते पैसे कामांसाठी वापरता येतील, असे ते म्हणाले.
बीओटीतून उत्पन्न वाढेल : विकास जैन यांनी सर्वच वॉर्डांत बीओटीच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत वाढवावेत, अशी सूचना केली. जगदीश सिद्ध यांनी नगरसेवकांची कामे यात नसताना प्रशासनाने आपली कामे का घुसवली, असा सवाल केला. या वेळी सुरेंद्र कुलकर्णी, प्रीती तोतला, ऊर्मिला चित्ते यांचीही भाषणे झाली.
आर्थिक वर्षात स्थिती बिकट
कसे जुळवणार गणित?
करवाढ करणे शक्य नसल्याने आहे त्या उत्पन्नाशिवाय अनावश्यक खर्चाला फाटा
नव्या मालमत्ता शोधण्याचा प्रस्ताव, बीओटीचे धोरण राबवण्याची पुन्हा टूम
आयुक्त काय म्हणतात?
स्पिल ओव्हरच्या कामांसाठी कर्ज, कर्जरोखे, करवाढ या पर्यायांवर लवकरच विचार करावा लागेल. किंवा नवे पर्याय समोर आले तर त्यावरही निर्णय घेता येईल. उत्पन्नाचे नवे स्रोत शोधावे लागणार आहेत; पण आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
मनपाच्या अर्थसंकल्पात घुसवली कामे; बहुतांश विकासकामे होणार ‘स्थायी’ सदस्यांच्या वॉर्डातच
आयुक्तांनी 2012-13 च्या अर्थसंकल्पात आधीच्या बजेटपेक्षा तब्बल 90 टक्के वाढ केल्याने आर्थिक परिस्थिती बिघडत गेल्याचे सांगताना स्पिल ओव्हरच्या कामांचे ओझे वाढल्याचे स्पष्ट केले. विकासकामे थांबवणार नसून स्पिल ओव्हरची कामेही घेत असल्याचे स्पष्ट केले. आपल्या काळात 250 कोटींची कामे मंजूर झाल्याचे सांगताना त्यांनी 20 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे अर्थसंकल्प तयार करण्यापर्यंत स्पिल ओव्हरच्या जेवढय़ा फायली आल्या तेवढय़ा निकाली काढल्याचे सांगितले.
कोणती कामे वाढली?
ज्या स्पिल ओव्हरच्या कामांबाबत आयुक्तांनी कर्जाचा धोका सांगितला ती कामे
16 सदस्यांच्या वॉर्डांतील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, पाइपलाइनची कामे
मोठी कामे नसल्याने 70 लाख ते 1 कोटी रुपयांची छोटी छोटी कामे ओढून घेतली
कोणाला होणार फायदा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सभापतींच्या वॉर्डातील 4 कोटींच्या कामांचा समावेश
सर्वच्या सर्व 16 सदस्यांनी आपापल्या वॉर्डातील कामांसाठी आग्रही राहत केला समावेश
याशिवाय प्रभावशाली, पण स्थायी समितीत नसलेल्यांच्या वॉर्डांतही कामांची सोय