आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

133 कोटींच्या कर वसुलीची तयारी, सोमवारनंतर प्रक्रिया सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तिजोरीत पैसे नसल्याची ओरड करणाऱ्या पालिकेचे बड्या तीन हजार मालमत्ताधारकांनी कराचे १३३ कोटी रुपये थकवले आहेत. ही रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून थकलेली असून उशिराने का होईना त्या रकमेची वसुली करण्याची पालिकेने तयारी केली आहे. आता दिवाळीनंतर रीतसर प्रक्रिया करून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. थकबाकीदारांच्या याद्या संबंधित वाॅर्ड अधिकाऱ्यांकडे रवाना झाल्या आहेत.
पालिका १३३ कोटी रुपये वसूल करू शकली तर मार्चअखेरीस उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकेल. प्रशासनाने मालमत्ता कराचे १४० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात स्थायी समितीने ५० कोटींनी वाढ केली. नंतर सर्वसाधारण सभेत आणखी ६० कोटी रुपये वाढवण्यात येणार असल्याने वसुली विभागासमोर २५० कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य आहे. त्यात १३३ कोटी रुपये ही मोठी रक्कम ठरणार आहे.

बड्या थकबाकीदारांमध्ये शहरातील विविध शैक्षणिक संस्था, काही खासगी संस्था, मोबाइल टॉवर असलेल्या इमारतींचा समावेश आहे. काही प्रकरणे न्यायालयात गेली आहेत. त्यामुळे यातील किती रक्कम वसूल होऊ शकते, हा प्रश्न आहे. तीन वर्षांपूर्वीही जुने वाद निपटून पालिकेला कर कसा मिळेल, यासाठी प्रयत्न झाले होते. परंतु पुढे काही होऊ शकले नाही. या वेळी तिजोरीत खडखडाट असताना आता पालिकेला माघार घेता येणार नाही.

राज्य,केंद्राचाही दबाव : स्मार्टसिटी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालिकेला मालमत्ता करासह अन्य सर्व करांच्या वसुलीचे प्रमाण ८० टक्क्यांच्या पुढे न्यावे लागणार आहे. त्याशिवाय केंद्र तसेच राज्य सरकारकडून कोणत्याही उपक्रमासाठी निधी मिळणार नाही. पालिकेचे मालमत्ता कर वसुलीचे प्रमाण कधीही ४० टक्क्यांच्या पुढे गेलेले नाही. खासगीकरण झाल्याने पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण मात्र वाढले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता कराची वसुली वाढवण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

समेट घडवून आणणार
^बड्या थकबाकीदारांच्या याद्या तयार करून आम्ही त्या वाॅर्ड अधिकाऱ्यांकडे पाठवल्या आहेत. दिवाळी संपल्यानंतर वसुलीची प्रक्रिया सुरू केली जाईल. काही प्रकरणे न्यायालयात आहेत. त्यांच्यासोबत समेट घडवून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. अय्युबखान, उपायुक्त.
असे आहे चित्र

{२५०कोटी : पालिकेचेमालमत्ता कराचे उद्दिष्ट
{५०कोटी : गेल्यासाडेसात महिन्यांतील वसुली
{ बड्या मालमत्ताधारकांकडून वसुली झाल्यास आकडा २००कोटींपर्यंत पोहाेचू शकतो.

का थकीत राहतो?
पालिकेकडून कर वसुलीचे कोणतेही नियोजन केले जात नाही. मालमत्ताधारकांना नियमितपणे नोटिसाही दिल्या जात नाहीत. अनेक मालमत्तांना कर लावलेला नाही. शिवाय पालिकेचा कर भरला नाही तर काहीही होत नाही, अशी अनेकांची धारणा आहे. त्यामुळे अनेक जण कर भरत नाहीत. जे भरतात त्यांनाही जाचाला सामोरे जावे लागते. परिणामी आपणहून कर भरण्यासाठी फारसे कोणी समोर येत नाही.

वसुली झाल्यास...
बड्या थकबाकीदारांकडून १३३ कोटींची थकबाकी पालिका येत्या काही महिन्यांत वसूल करू शकली तर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देता येतील. ठेकेदारांची देणीही दिली जाऊ शकतील. स्मार्ट सिटीसाठी निधी जमेल. रस्त्यांची कामे मार्गी लागतील. पालिकेने पहिल्या टप्प्यात काही रक्कम दिली नाही, म्हणून काही रस्त्यांची कामे थांबली आहेत तर काही संथपणे सुरू आहेत. त्यांना वेग मिळेल.