आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची २ बँक खाती सील, ३०० सफाई कर्मचा-यांचा पीएफ थकवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपाने काम दिलेल्या बचत गटांच्या तीनशेहून अधिक सफाई कामगारांचे अकरा महिन्यांचे पीएफचे २१ लाख ९२२ रुपये थकवल्यामुळे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने महापालिकेची दोन बँक खाती सील केली आहेत.

विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त सुधीर गणवीर यांनी या कारवाईला दुजोरा दिला. हाती आलेल्या माहितीनुसार महापालिकेने शहरातील काही भागांत साफसफाईचे काम काही बचत गटांना दिले आहे. २००९ पर्यंत या बचत गटांच्या सफाई कर्मचा-यांच्या पीएफची जबाबदारी मनपाकडेच होती. नंतर संबंधित बचत गटांना सूचना देऊन स्वतंत्र पीएफ क्रमांक घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार नंतर प्रक्रिया सुरू झाली. पण ही जबाबदारी मनपाकडे असताना आॅगस्ट २००८ ते जून २००९ या अकरा महिन्यांच्या कालावधीत ३०० हून अधिक सफाई कर्मचा-यांचा पीएफ मनपाने कापून घेतला पण तो पीएफ कार्यालयात जमाच केला नाही. नंतरच्या काळात याबाबत तक्रारी आल्या. पीएफ जमा नसल्याने त्यांची सेवाही धरली जात नसल्याने तो पीएफ मनपाला जमा करायला लावा, अशा मागणीवजा तक्रारी पीएफ कार्यालयाकडे आल्या. त्यानुसार पीएफ कार्यालयाने चौकशी सुरू केली. या बाबत अनेकदा थेट आयुक्तांपर्यंत पत्रव्यवहार करण्यात आला. पण मनपाकडून योग्य तो प्रतिसाद कधीच मिळाला नाही. मनपाने अनेकदा या चौकशीलाही कुणाला पाठवले नाही. शेवटी सगळी कागदपत्रे पाहून पीएफ आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी या प्रकरणात मनपाला त्या अकरा महिन्यांचा थकलेला २१ लाख ९२२ रुपयांचा पीएफ तातडीने भरण्याचे आदेश दिले. त्यासाठी पंधरा दिवसांची मुदतही देण्यात आली होती. पण मनपाने काहीच न केल्याने अखेर आज पीएफ कार्यालयाने मनपाची एचडीएफसी व आयडीबीआय बँकेतील दोन्ही खाती सील केली. या प्रकरणाच्या चौकशीला व पत्रव्यवहाराला काडीची किंमत न देणा-या मनपाने आज खाती सील होताच पीएफ कार्यालयात धावही घेतली.
बातम्या आणखी आहेत...