आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation And Cidco Issue At Aurangabad

आक्रोश: सिडकोला सांभाळण्यात मनपा नापास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मार्च - 2013 मध्ये सिडकोचे महापालिकेकडे हस्तांतर होऊन सात वष्रे पूर्ण होतील. पण हस्तांतरानंतर सिडकोवासीयांना सुविधा पुरवण्यात महापालिका नापास झाल्याच्या भावना लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत. काही प्रमाणात रस्त्यांचा विकास वगळता वीज, पाणी, स्वच्छता या आघाड्यांवर मनपा ‘नापास’ झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सिडकोचे महापालिकेकडे 1 एप्रिल 2006 मध्ये हस्तांतर करण्यात आले. तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री राजेश टोपे यांनी हस्तांतरानंतर सिडकोवासीयांना लीज होल्डचे फ्री होल्ड करण्याचे आश्वासन दिले होते, पण ते आश्वासन केव्हाच हवेत विरले आहे. महापालिकेकडे सिडकोची सूत्रे सुपूर्द केल्यानंतर समस्यांमध्ये वाढच होत गेली आहे.

सिडकोकडे कार्यभार असताना वीज दुरुस्ती, स्वच्छता, कीटकनाशक फवारणी व ड्रेनेजच्या अडचणी तत्काळ सोडवल्या जायच्या, पण मनपात आल्यानंतर सगळा सावळागोंधळ असल्याचे सांगत लोकप्रतिनिधींनी मनपाच्या कारभारावर ताशेरे ओढले.

सिडकोत असताना
>तक्रार नोंदवल्यानंतर दोन ते चार तासांत समस्येचे निराकरण व्हायचे.
>उद्यानांची देखभाल वेळच्या वेळी केली जात होती. खेळाचे साहित्य व्यवस्थित होते. हिरवळीची देखभाल व्हायची.
>ड्रेनेजच्या समस्येचे तत्काळ निराकरण केले जात होते.
>साफसफाईसाठी विशेष झोन बनवण्यात आले होते व सकाळी नियमित फवारणी केली जात होती.
>रस्त्यांची स्थिती चांगली होती.
>सिडकोत असताना येथील नागरिकांना कमीत कमी कर भरावा लागत होता.

मनपात आल्यानंतर
>फवारणी होते की नाही हेच कळत नाही.
>स्वच्छता व साफसफाईमध्ये मनपा सपशेल अपयशी.
>तक्रार दाखल केल्यानंतर आठ-आठ दिवसही कारवाई होत नाही.
>विजेची देखभाल व दुरुस्तीमध्ये अक्षम्य दुर्लक्ष.
>उद्यानांमधील खेळणी तुटलेली, हिरवळीचा पत्ताच नाही.
>सलीम अली जैसे थे, नौकाविहार सुरू झाले नाही.


अतिक्रमणे वाढली
> सिडकोकडून महापालिकेला मिळणार्‍या सेवाकराच्या तुलनेत सुविधा मात्र अपुर्‍याच आहेत. सिडकोत असताना साफसफाई, ड्रेनेज, फवारणी नियमित व्हायची. सिडकोतील ग्रीनबेल्टमध्ये झाडे होती. मनपाकडे हस्तांतर झाल्यानंतर ग्रीन बेल्ट भकास झाली. ग्रीन बेल्टमध्ये पार्किंग, टपर्‍यांची अतिक्रमणे वाढली आहेत. प्रमोद राठोड, नगरसेवक, सिडको एन-3, >

सुविधांच्या तुलनेत मनपा नापास
> सिडकोत असताना मिळणार्‍या सुविधांची तुलना मनपाकडील हस्तांतरानंतर मिळणार्‍या सुविधांशी केली असता मनपा नापास असल्याची प्रचिती येईल. अनिल जैस्वाल, नगरसेवक, अयोध्यानगर

उद्याने, सलीम अली भकास
> हडकोतील विवेकानंद उद्यान फुललेले होते. सलीम अली सरोवरात नौकाविहाराची परवानगी होती. हस्तांतरानंतर उद्याने व सरोवराचे सौंदर्य धोक्यात आले आहे. मनपाकडे सिडकोचा कार्यभार गेल्यानंतर उद्यानांची रयाच गेली. मोहन मेघावाले, नगरसेवक, हडको

वेळ गेल्यानंतर होते काम
> सिडको प्रशासनाच्या तत्पर सेवेची तुलना महापालिकेशी होऊ शकत नाही. हस्तांतर झाल्यानंतर सुविधांसाठी नागरिकांचा आक्रोश सुरू आहे. दुरुस्तीसारख्या किरकोळ कामाला आठ-आठ दिवस लागतात. सत्यभामा शिंदे, नगरसेविका, एन-2

प्रत्येक दिवस अडचणीचा
> हस्तांतर झाल्यानंतरचा प्रत्येक दिवस अडचणीचा आहे. रस्ते, वीज, ड्रेनेज, साफसफाई, फवारणी आदी समस्या वाढल्या आहेत. नाहरकत प्रमाणपत्रासाठी सिडकोकडे नागरिकांना चकरा माराव्या लागतात. रेखा जैस्वाल, नगरसेविका, आविष्कार कॉलनी

सोसायट्यांमध्ये कामे झाली
> सिडकोत सोसायट्यांमध्ये कामे होत नव्हती. हस्तांतरानंतर सोसायट्यांमध्ये विकासकामे करता येऊ लागली. मनपाने अंतर्गत रस्त्यांचा विकास केला, पण विजेची कामे, ड्रेनेज दुरुस्ती, स्वच्छता या समस्या सोडवण्यात मनपाला अपयश आले. सविता घडमोडे, नगरसेविका, विठ्ठलनगर-सिडको