आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Anniversiry Celebration

सलग 18 तास अभ्यास; 290 विद्यार्थ्यांचा सहभाग, 95 टक्के मिळवणार्‍याला एक लाखाचे बक्षीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दहावीच्या परीक्षेतील मनपा शाळांतील विद्यार्थ्यांपैकी 95 टक्के गुण घेणार्‍या विद्यार्थ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज केली. मनपाच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 18 तास अभ्यास उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली.
महानगरपालिकेचा येत्या 8 तारखेला 31 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात 18 तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत या उपक्रमात 290 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महापौर कला ओझा यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचाही अभ्यास करून ते अंगीकारावे, असे आवाहन केले. मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी मनपा शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांपैकी 95 टक्के गुण घेणार्‍या विद्यार्थ्याला मनपाच्या वतीने एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यासात लक्ष घालून त्या दिशेने पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.

रुग्णांना ब्लँकेट व सतरंजी वाटप
शासकीय कर्करोग रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना ब्लँकेट व सतरंजी वाटप करण्यात आले. या वेळी महापौर कला ओझा, सभागृहनेते सुशील खेडकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयर्शी कुलकर्णी, उपायुक्त रवींद्र निकम यांची उपस्थिती होती.
आज, उद्याचे कार्यक्रम स्थगित
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती आणि वंशभेदाविरुद्ध आयुष्यभर लढणारे डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निधनामुळे देशात पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून त्यामुळे शनिवार व रविवारी मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम तूर्तास रद्द करण्यात आल्याचे महापौर कला ओझा यांनी सांगितले.