औरंगाबाद - औरंगाबाद महानगर पालिकेचे उपायुक्त आशिष पवार आणि प्रकल्प संचालक प्रमोद खोब्रागडे यांना शासनाचे पैसे लाटण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.
मराठी वृत्तवाहिनीवरील वृत्तानुसार, महानगर पालिकेतंर्गत राबवल्या जाणार्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपात पालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकार्यांना अटक करण्यात आली आहे. खोटी बीले सादर करुन शासनाचे एक कोटी 70 लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न उपायुक्त पवार आणि खोब्रागडे यांनी केल्याचा आरोप आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 1145 युवकांना प्रशिक्षण दिल्याचे दाखवण्यात आले आणि त्यापोटी कोट्यवधी रुपेय लाटण्यात आल्याचा आरोप आहे.
अटक करण्यात आलेले आशिष पवार पालिका उपायुक्त आहेत, तर प्रमोद खोब्रागडे हे प्रकल्प संचालक आहेत. कोट्यवधीच्या या घोटाळ्यात अनेक बडे अधिकारी अडकले असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये महानगर पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 22 एप्रिल रोजी 113 वार्डांसाठी मतदान होणार आहे. पालिकेत गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेना - भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. यंदाही दोन्ही पक्षांची युती झाली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वंतत्र लढत आहे.
पालिकेचे माजी आयुक्त कृष्णा भोगे यांनी पालिका निवडणूकीत सर्व पक्ष रस्ते आणि पाण्याची चर्चा करत आहेत, पण कोणीच पालिकेतील भ्रष्टाचार कसा निपटून काढणार यावर बोलत नसल्याची खंत एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती.
पालिका उपायुक्त पवार आणि प्रकल्प संचालक खोब्रागडे एक कोटी 70 लाख रुपये परस्पर लाटण्याचा प्रयत्न करु शकत नाही, असा सूर पालिका वर्तूळातून उमटत आहे. या प्रकरणात पालिकेतील धुरिणांचाही हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.