आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाळ आयुक्तांच्या दालनात, कार्यकर्ते व सुरक्षा रक्षकांत झाली बाचाबाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वारंवार निवेदन देऊनही महापालिका प्रशासन दखल घेत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत: विहिरीतील गाळ काढून अगदी गनिमी काव्याने पालिका आयुक्तांना भेट दिला. मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन काळे यांनी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.

गाळ काढल्यास शहरातील विहिरी पाण्यासाठी सक्षम पर्याय होऊ शकतात. पण महापालिकेच्या वतीने उदासीनता दाखवली जात असल्याने प्रशासनाच्या विरोधात मनसेने आंदोलन पुकारले होते. गुरुवारी सकाळी सर्मथनगरातील विहिरीतील गाळ काढून कार्यकर्त्यांनी महापालिकेवर कूच केली. गाळ घेऊन कार्यालयात प्रवेश देण्यास सुरक्षा रक्षकांनी कार्यकर्त्यांना मज्जाव केला. या वेळी वाद झाला आणि कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर जोरदार नारेबाजी केली. दरम्यान, मनसेचे नगरसेवक राज वानखेडे यांना कार्यालयात जाण्याची परवानगी मिळाली आणि त्यांनी आयुक्तांची भेट घेतली. गाळ भेट न देण्याच्या अटीवर मोजक्या आंदोलकांना भेटीची आयुक्तांनी परवानगी दिली. आयुक्तांच्या दालनाबाहेर सुरक्षा रक्षकांचा कडक बंदोबस्त होता. केवळ पाच आंदोलक आत जाऊ शकतील, असे सुरक्षा रक्षकांनी सांगितल्यानंतर कार्यकर्ते संतापले आणि घोषणा देत दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. अखेर दहा पदाधिकार्‍यांना आत जाण्याची परवानगी मिळाली. सुरक्षा रक्षकांनी प्रत्येक कार्यकर्त्याची झडती घेऊन त्यांना दालनात सोडले. कार्यकर्त्यांनी गाळाने भरलेली कॅरीबॅग खिशात घालून आणली आणि गजानन काळे यांच्या हातात दिली. गाळाची पिशवी पाहताच सुरक्षा रक्षक सरसावले. मात्र, आयुक्तांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत कार्यकर्त्यांना आश्वासन दिले आणि कार्यकर्ते माघारी परतले. शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी प्रथम आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांचे अभिनंदन केले. शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, राज वानखेडे, गजानन काळे, गणेश वानखेडे, सुमीत खांबेकर यांनी दहा दिवसांत विहिरींची स्वच्छता करावी, तसेच पाणी गळतीच्या विरोधात पालिकेने पाऊल उचलावे, अशी मागणी केली.लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. आंदोलनात अरविंद धीवर, डॉ. शिवाजी कान्हेरे, दिलीप बनकर, ज्ञानेश्वर डांगे, गणेश जगधने, किशोर गिरी, तुषार पाखरे, वैभव मिटकर, ललित देशपांडे, विशाल आहेर, अरुण औताडे, अजय गट्टाणे, अमित भांगे, अमजद खान, रवी गायकवाड, विक्रम परदेशी, अण्णा मगरे, संतोष पवार, रूपाली पवार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कार्यकर्त्यांनी 35 ट्रॅक्टर काढला गाळ
सर्मथनगरातील विहिरीतून कार्यकर्त्यांनी 35 ट्रॅक्टर गाळ काढला. येत्या आठ दिवसांत या विहिरीचे पाणी वापरण्यासाठी उपयुक्त होईल, असा दावा कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अनेक जण घराबाहेर येऊन नेमके काय सुरूआहे हे पाहत होते. गाळ काढल्यानंतर वाहन रॅली काढून गाळ महानगरपालिका कार्यालयापर्यंत नेण्यात आला.