आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांच्या आदेशाला दिला खो; घनकचर्‍यावर नियंत्रण ठेवण्यास अधिकार्‍यांची माघार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- घनकचरा व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनीप्रभागनिहाय सहा अधिकार्‍यांची निवड केली होती. पण या अधिकार्‍यांनी कामाचा व्याप जास्त असल्यामुळे घनकचरा व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याचे सांगून सपसेल माघार घेतली.

शहरात दररोज 450 टन निघणार्‍या घनकचर्‍यासाठी दोन हजार मजूर काम करतात. मजुरांची संख्या कमी असून यापैकी अनेक जण गैरहजर असतात. त्यामुळे कचर्‍याचे ढिगारे साचतात. अनेक भागात नालेसफाई झालेली नाही. फवारणीही होत नाही. 21 जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या विषयावरून गदारोळ झाल्यावर महापौरांनी स्वच्छतेचे आदेश दिले. उपायुक्त सुरेश पेडगावकर यांनी सहा अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येईल, असे सभागृहात सांगितले. त्यानुसार आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी 20 जूनला डी. पी. कुलकर्णी, रवींद्र निकम, सखाराम पानझडे, सिकंदर अली, शिवाजी झनझन आणि हेमंत कोल्हे यांची नियुक्ती केली होती. या समितीने दररोजच्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. सहा जुलै रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष ठेवणे शक्य नसल्याची कबुली झनझन आणि कुलकर्णी यांनी दिली.

प्रभागनिहाय नियुक्त अधिकारी
वॉर्ड
'अ'- हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता
'ब'- रवींद्र निकम, उपायुक्त
'क' एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता
'ड' डी. पी. कुलकर्णी, सहायक संचालक
'ई' सय्यद सिकंदर अली, कार्यकारी अभियंता
'फ' शिवाजी झनझन, मुख्य अग्निशमन अधिकारी

>घनकचरा व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्तांनी दोन दिवसांसाठी जबाबदारी दिली होती. त्यामध्ये आम्ही आमच्या समस्या त्यांना सांगितल्या होत्या. तेव्हाच त्यांनी सोपवलेली घनकचर्‍याची जबाबदारी काढून घेतली आहे.
-सिकंदर अली, कार्यकारी अभियंता

>घनकचरा व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आयुक्तांनी दिली हे खरे आहे. पण कामाचा व्याप खूप मोठा आहे. त्यामुळे पूर्णपणे लक्ष देणे शक्य होत नाही.
-रवींद्र निकम, उपायुक्त, प्रशासन

घनकचरा व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केलेले अधिकारी वॉर्डात फिरकतच नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा झनझन आणि कुलकर्णी यांनी शनिवारी स्थायीच्या बैठकीत वेळ देता येत नसल्याची कबुली दिली.
-समीर राजूरकर, सदस्य, स्थायी समिती.

>या संदर्भात आपण पाहणी करून वाहन व मजूर कमी असल्याचा अहवाल सादर केलेला आहे. अपुर्‍या मनुष्यबळामुळे कचरा उचलला जात नसल्याचेही स्पष्ट केलेले आहे.
-हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता