आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपत गेलेल्या चौघांनाच तिकीट, आठ नगरसेवकांचे पत्ते कट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपा निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपत प्रवेश केलेल्या आठ नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले. त्यात माजी आमदार किशनचंद तनवाणी समर्थक शिवसेनेच्या प्रीती तोतला, हुशारसिंग चव्हाण काँग्रेसचे माजी सभागृहनेता रावसाहेब गायकवाड यांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणूक त्यानंतर सर्वच पक्षांतील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना खेचण्याची भाजपमध्ये स्पर्धा सुरू होती. महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळेल या आशेवर १२ नगरसेवकांनी प्रवेशही केला. मात्र, त्यापैकी फक्त चार जणांनाच भाजपच्या नेत्यांनी संधी दिली आहे. मूळ शिवसेनेचे नगरसेवक जगदीश सिद्ध यांच्या वहिनी रिना सिद्ध, जयश्री सुरेंद्र कुलकर्णी, मनसेचे राजगौरव वानखेडे आणि काँग्रेसचे प्रमोद राठोड यांना संधी देण्यात आली. मात्र काँग्रेसमधून आलेले रावसाहेब गायकवाड, रवी कावडे, दामुअण्णा शिंदे, शिवसेनेतून आलेले हुशारसिंग चव्हाण, प्रिती तोतला, सविता सुरे, आगा खान, राष्ट्रवादीतून आलेले प्रल्हाद निमगावकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

सिडको एन मध्ये हुशारसिंग चव्हाण, बन्सीलालनगरातून गायकवाड यांच्यासाठी आमदार अतुल सावेंचे प्रयत्न होते. मात्र, वाटाघाटीत हे वॉर्डच शिवसेनेला सोडण्यात आले. दलित समाजाचे प्रतिनिधी असलेले जालिंदर शेंडगे, गौतम खरात, संतोष भिंगारेंनाही भाजपच्या नेत्यांनी शेवटपर्यंत झुलवत ठेवले. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असल्याने तिकीट नाकारलेल्यांना महामंडळावर स्थान देण्याची मलमपट्टी सावे यांनी केली आहे. उमेदवारी नाकारताच गायकवाड यांनी भाजपमध्ये मागासवर्गीयांवर अन्याय झाल्याचे सांगितले. तर चव्हाण यांनी हिंदुत्वासाठी उमेदवारीवर पाणी सोडल्याचे स्पष्ट केले.

नेत्यांचाच गोतावळा
शिवसेना-भाजपपदाधिकारी, नेत्यांनी कार्यकर्त्यांना लाथाडत स्वत:च्या मुले, पुतणे, बहिणींना उमेदवारी दिली. त्यात खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट यांचा समावेश आहे.